स्वातंत्र्यदिनापर्यंत नासुप्रच्या विलीनीकरणाचा निर्णय

file photo
file photo

नागपूर : नासुप्रच्या मनपात विलीनीकरणाचा निर्णय येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत होणार असल्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या नागपूरकरांची नासुप्रपासून सुटका होणार असून शहरात एकच नियोजन प्राधिकरण राहील. शहरात एकच नियोजन प्राधिकरणचा आग्रह नागपूरकरांनी लावून धरला होता. याबाबत राज्य शासनाने तत्त्वतः मंजुरीही दिली होती. नासुप्रच्या संपत्ती आणि दायित्वाचा महापालिका आणि एनएमआरडीए यांच्यात वाटा ठरविण्यास वर्षभराचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. यासाठी डिसेंबर 2017 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, दीड वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. मागील आठवड्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वनामती येथे घेतलेल्या बैठकीतही नासुप्र बरखास्तीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. अखेर आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत नासुप्रचे मनपात विलीनीकरणाबाबत 14 ऑगस्टपर्यंत शासन निर्णय करण्याचे ठरले. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सचिव मनीषा म्हैसकर, महापौर नंदा जिचकार, आमदार डॉ. मिलिंद माने, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, मनपा आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते. नागपूर सुधार प्रन्यासच्या सर्व मालमत्तासह सर्व मनपाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. नासुप्र सभापती आणि मनपा आयुक्त यांच्यात करार होईल. तसेच न्यायालयीन प्रकरणेही मनपाला हस्तांतरित करण्यात येतील. कर्मचारी मनपात किंवा एनएमआरडीएकडे वर्गीकृत करण्यात येतील. नासुप्रची प्रशासकीय इमारत वगळून नासुप्रच्या शहरातील सर्व मालमत्ता मनपाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. नासुप्र बरखास्त करून मनपात विलीन करण्याची जुनी मागणी होती. त्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने नासुप्र मनपात विलीन करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले. नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या (एनएमआरडीए) 2019-20 या वर्षांच्या 1529.84 कोटींच्या अंदाजपत्रकास आज एनएमआरडीए अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेने एनएमआरडीएच्या लोगो निश्‍चित करण्याच्या प्रस्ताव मान्य करण्यात आला. एनएमआरडीएवर आवश्‍यक 156 अधिकारी व कर्मचारी प्रतिनियुक्तीने मनपातून किंवा नासुप्रतून घेण्यात मान्यता देण्यात आली. एनएमआरडीएच्या कार्यकारी समितीवर 6 अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीलाही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.
घरकुलचा निधी 100 कोटींपर्यंत
एनएमआरडीएअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील कामांची देयके प्राधिकरणाच्या निधीतून मंजूर कण्यास 25 कोटींची मर्यादा होती. ती 100 कोटी करण्यात आली आहे. याच योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची ऑनलाइन सोडतीद्वारे विक्री करून वाटप करण्यासाठी घरकुलाचे आरक्षण धोरण ठरविण्याच्या प्रस्तावालाही त्यांनी मान्यता दिली. फुटाळा तलाव, संगीत कारंजे, साऊंड व लेझर शो तसेच अंबाझरी लाइट, साऊंड व लेझर शोच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com