गडकरी म्हणाले, नागपुरात शेतकरी प्रशिक्षण संस्था सुरू करणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

चारदिवसीय राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात 30 पेक्षा जास्त विषयांवर कार्यशाळा झाल्या. त्यात 60 पेक्षा जास्त तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी, येथील शेतीचा विकास करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. युनायटेड फॉस्फोरस लिमिटेडच्या सहकार्याने (युपीएल) नागपुरात शेतकरी प्रशिक्षण संस्था उभारण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 
ऍग्रोव्हिजन 2019 कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी गडकरी म्हणाले, ऍग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे. जवळपास 3 लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या विकासाकरिता आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कृषी प्रदर्शन दिशादर्शक ठरणारे आहे. यातून नवे तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या साहाय्याने शेती विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यत पोहोचविण्याची गरज आहे. ते पोहोचल्यास विकास यात्रा गतिशील होईल. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी प्रशिक्षण देण्यासाठी "युपीएल'च्या मदतीने पन्नास-पन्नास टक्के भागीदारीवर शेतकरी प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली. यावेळी ऍग्रोव्हिजनमध्ये विविध विषयांवर घेण्यात आलेल्या कार्यशाळा आणि सत्रांबद्दल त्यांनी माहिती दिली. 
समारोपीय कार्यक्रमात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. सी. डी. मायी, पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे डॉ. आशीष पातुरकर आणि आयोजन सचिव रवी बोरटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. सी. डी. मायी यांनी केले. संचालन रेणुका देशकर तर आभार प्रदर्शन रमेश मानकर यांनी मानले. 

विविध विषयांवर अद्ययावत माहिती 
पंचवीस यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी ऐकल्या. विदर्भातील डेअरी आणि दुग्ध व्यवसाय विकास या विषयावरील एकदिवसीय परिषदेला दुग्धव्यवसायात असणाऱ्या आणि पदार्पण करू इच्छिणाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी शेतांशी संबंधित, आंतरराष्ट्रीय व्यासपीठाशी संबंधित व्यवसाय, दुग्धशाळा, रंगीत सूती, पशुधन, मधमाशीपालन आणि इतर अनेक विषयांवर उत्पादन, विपणन आणि विक्रीवरील कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सविस्तर छायाचित्रे आणि विविध विषयांवर अद्ययावत माहिती दिली. प्रदर्शनस्थळी असलेल्या 350 पेक्षा जास्त स्टॉल्समध्ये शेती आणि शेतीविषयी बरीच माहितीदेखील दर्शविली गेली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin gadkari said farmer training institute at nagpur