बांधवांनो, अगोदर सत्य तर समजून घ्या 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 December 2019

यशवंत स्टेडियम येथून प्रारंभ झालेल्या रॅलीत हजारो नागपूरकरांनी सहभाग नोंदवला. हे विधेयक अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही. ज्या राजकीय पक्षांना भीती वाटते की यापुढे आपले सरकार येऊ शकत नाही, ते चुकीचा प्रचार करीत आहे. त्यांना आगामी काळात विजयाचे काही संकेत दिसत नसल्याने मुसलमानांना भडकवत आहेत.

नागपूर : भारतीय नागरिकत्व संशोधन विधेयक मुसलमानांच्या विरोधात नाही तर घुसखोरांच्या विरोधात आहे. कॉंग्रेस पक्ष मुसलमानांना भडकवत आहे. हे विद्येयक मुसलमानांच्या विरोधात असल्याचे भासवत आहे. म्हणूनच मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, या विधेयकातील सत्य जाणून घ्या, कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. 

क्लिक करा - शेतकऱ्यांसाठी खुशखबर, दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार

लोकाधिकार मंचने रविवारी (ता. 22) विधेयकाच्या समर्थनार्थ काढलेल्या भव्य रॅलीला नितीन गडकरी संबोधित करीत होते. याप्रसंगी मंचावर गोविंद गिरीजी महाराज, जितेंद्रनाथ महाराज, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर संदीप जोशी यांच्यासह विधेयकाला समर्थन करणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Image may contain: 8 people, people smiling, crowd

 

सकाळी यशवंत स्टेडियम येथून प्रारंभ झालेल्या रॅलीत हजारो नागपूरकरांनी सहभाग नोंदवला. हे विधेयक अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही. ज्या राजकीय पक्षांना भीती वाटते की यापुढे आपले सरकार येऊ शकत नाही, ते चुकीचा प्रचार करीत आहे. त्यांना आगामी काळात विजयाचे काही संकेत दिसत नसल्याने मुसलमानांना भडकवत आहेत. देशात मोदींचे राज्य आले, आरएसएसचे राज्य आले, मुसलमानांचा धोका निर्माण झाला, ते तुम्हाला पाकिस्तानात पाठवतील, अशी भीती विरोधक मुसलमानांमध्ये निर्माण करीत असल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला आहे. 

कॉंग्रेस केवळ तुम्हाला व्होट मशीन समजते

मी आमदार होतो तेव्हा शासकीय कोट्यातून अंजुमन इस्लाम कॉलेजची स्थापना केली. या संस्थेने हजारो मुसलमान विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित केले. येथे शिकलेले विद्यार्थी आज परदेशात स्थायिक झाले आहेत. देशातल्या तमाम मुसलमानांना आव्हान करतो की विधेयकामागचे सत्य जाणून घ्या. कॉंग्रेस केवळ तुम्हाला व्होट मशीन समजते. तुमचा विकास केवळ भाजपसोबत आल्यावरच होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

Image may contain: 1 person, sitting

आपण एक, मिळून मिसळून राहू

आपण एक असून, मिळून मिसळून राहू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्यानुसारच आपल्याला आपले जीवन जगायचे आहे. विधेयकातील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी आजची रॅली आहे. आपल्याला भारताला सुखी, समृद्धी आणि सशक्त करायचे आहे. भूक, भीती आणि भ्रष्टाचारातून मुक्त करायचे आहे. गरिबाला जात, पंथ, भाषा नसते हेच दाखवून द्यायचे आहे. गरिबीमुक्त भारत निर्माण करणे एवढाच आपले स्वप्न आहे. भाजप सरकारच्या विधेयकाला संमती द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

अधिक माहितीसाठी - Video : माजी मुख्यमंत्री फडणवीस उतरले रस्त्यावर, कशासाठी?

विविध संघटनांचा सहभाग

भारत सरकारने मंजूर केलेले नागरिकता संशोधन विधेयकाचे (सीएए) समर्थन करण्यासाठी आणि या विधेयकाबाबत असलेल्या गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, चंद्रशेखर बावनकुळे आदींचा सहभाग होता. रॅली झाशी राणी चौकात पोहोचल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाशीच्या पुतळ्याला मार्ल्यापण केले. तसेच व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला महापौर संदीप जोशी यांनी माल्यार्पण केले. रॅलीत भारतीय जनता पक्ष, विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांचा सहभाग होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin gadkari says, Muslim brothers, understand the truth in CAA