माझ्या डोक्‍याची किंमत महिन्याला दोनशे कोटी : गडकरी

रेशीमबाग - अग्रवाल भावंडांना मेयर इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर नंदा जिचकार, शेजारी तानाजी वनवे, डॉ. विकास महात्मे, डॉ. मिलिंद माने, संदीप जोशी.
रेशीमबाग - अग्रवाल भावंडांना मेयर इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महापौर नंदा जिचकार, शेजारी तानाजी वनवे, डॉ. विकास महात्मे, डॉ. मिलिंद माने, संदीप जोशी.

नागपूर - माझ्या डोक्‍याची किंमत प्रतिमहिना दोनशे कोटी रुपये आहे. एवढे नावीन्यपूर्ण प्रयोग मी माझ्या विभागामार्फत राबवत असतो, असे प्रतिपादन करून महापौरांनी पहिला इनोव्हेशन अवॉर्ड मलाच द्यायला हवा होता, अशी मिष्किली केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केली. 

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात मेयर इनोव्हेशन पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपा सत्तापक्षनेते संदीप जोशी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक ॲड. निशांत गांधी, उपक्रमाचे समन्वयक केतन मोहितकर व प्रशांत कडू हेही उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ‘नागपूर महानगरपालिकेला माझ्या कल्पनेतील प्रकल्प देऊन कोट्यवधी रुपये वाचवले आणि कमावण्याची संधीही दिली. सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून वीज मंडळाला दिल्याने ऐंशी कोटी रुपयांचा फायदा झाला. दुसरीकडे मनपाच्या डिझेल बस सीएनजीवर आणल्या आणि त्यातून साठ ते ऐंशी कोटी उत्पन्न होणार. हे दोन्ही प्रकल्प माझ्या डोक्‍यातील आहे; त्यामुळे महापालिका मलाच एखादे बक्षीस का देत नाही, असा प्रश्‍न पडतो.’ गडकरींच्या या मिष्किलीवर सभागृहात जोरदार हशा पिकला. सरकारमध्ये ‘आउट ऑफ बॉक्‍स’ काम करण्याची अपेक्षा नाही; कारण तिथे खाली माना घालून डोके न लावता काम करण्याची सवय अनेकांना झाली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

कार्यक्रमात ऋषिकेश कडू, स्पर्श व पर्ल अग्रवाल, नंदकिशोर मोहनकर आदी शंभर इनोव्हेटर्सला पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर विष्णू मनोहर, तनुजा नाफडे, डॉ. अविनाश जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

‘जुन्या साड्या, कपडे, जोडे द्या’ 
घरी पडलेल्या जुन्या साड्या, कपडे, जोडे-चपला तुमच्याकडून विकत घेण्याची योजना माझ्या डोक्‍यात आहे. जुन्या साड्या व कपडे व्यवस्थित करून गरिबांना दहा आणि पंधरा रुपयांना मिळतील, अशी व्यवस्था करणार आहे. तर जोडे-चपला शिऊन त्यांना नवीन करून पाच रुपयांत गडचिरोलीसह संपूर्ण देशातील गरिबांना पाच रुपयांत उपलब्ध करून देण्याची योजना आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

तुम्ही जो प्रयोग कराल, तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होणे आवश्‍यक आहे. तुम्हाला पैसा मिळेल आणि लोकांना रोजगार मिळेल, असा प्रयोग करा.
-नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com