नितीन राऊत कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नागपूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉंग्रेसने भाकरी फिरवली असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच पाच कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून यात नागपूरचे डॉ. नितीन राऊत आणि अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांना स्थान देण्यात आले. राऊतांच्या नियुक्तीने शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत राज्यातील सर्वच प्रतिनिधींना स्थान देण्यात आले असून नागपूर विभागातून डॉ. नितीन राऊत तर अमरावतीमधून यशोमती ठाकूर यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय बसवराज पाटील, विश्‍वजित कदम, मुज्जफर हुसेन यांची कार्यध्यक्षपदी नियुक्ती करून प्रादेशिक व जातीय समीकरणसुद्धा साधले आहे.
लोकसभेतील पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच थोरात यांच्या नावाची चर्चा होती. चव्हाण यांच्याकडे काळजीवाहू अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. नितीन राऊत अनुसूचित जाती विभागाच्या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून राऊत यांचा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी पंगा झाला होता. राऊत, चतुर्वेदी या जोडगोळीने चव्हाण तसेच माजी खासदार विलास मुत्तेमवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. दोन वर्षांपासून ठाकरे-राऊत गटामध्ये विस्तवही जात नाही. चव्हाण जाताच राऊत यांना कार्याध्यक्ष केल्याने मुत्तेमवार-ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्‍यता आहे. विकास ठाकरे स्वतः पश्‍चिम तर राऊत उत्तर नागपूरमधून विधानसभा लढण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत दोघांचाही पराभव झाला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Raut Congress Working President