मी नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत...शपथ घेतो की... 

केवल जीवनतारे 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • चळवळीतील कार्यकर्ता 
  • डॉ. नितीन राऊत दुसऱ्यांदा मंत्री 
  • कार्यकर्त्यांचा उत्तर नागपुरात जल्लोष 
  • भोजनदानाची चळवळ 

नागपूर : बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर भीमसैनिक दरवर्षी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी येत होता. उसळलेल्या भीमसागर गावखेड्यातून आणलेल्या शिदोरीवर चार दिवस काढत होता. चाळीस वर्षांपूर्वी दीक्षाभूमी सपाट होती. स्मारकाचे "पिल्लर' तेवढे उभे दिसत होते. रस्त्याच्या कडेला कांदा भाकरीची शिदोरी घेऊन बसलेले अनुयायी दिसत होते. शिळी भाकर कडक झाल्याने दाताने चावत नव्हती, यामुळे तीच भाकरी चहात बुडवून ओली करून खात असल्याचे बघून ह्दय हेलावत होते. हे चित्र बघून काळीज तुटले आणि पॅंथरच्या चळवळीतून तयार झालेल्या नितीन राऊत या कार्यकर्त्याने उराशी "संकल्प' करीत भोजनदानाची एक चळवळ उभी केली. 

कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा अनुभव 
एकाचवेळी सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या कक्षा रुंदावत त्यांनी राजकारणाच्या पटलावर यश मिळवले. गुरुवारी शिवतीर्थावर डॉ. नितीन राऊत यांनी दुसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिमंडळात समावेश झाल्याने डॉ. राऊत यांच्या घरासमोर जल्लोष करण्यात आला, फटाके फोडण्यात आले.

दुग्ध व पशुसंवर्धन खाते सांभाळले
डॉ. नितीन राऊत यांच्यासाठी 2019 हे साल लाभदायी ठरले. जुलै 2019 मध्ये कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. राऊत यांची निवड झाली. महिनाभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या हातून 2014 मध्ये निसटलेला "उत्तर' मतदारसंघ पुन्हा मिळवला. 2009 मध्ये डॉ. राऊत यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात दुग्ध व पशुसंवर्धन खाते सांभाळले होते. यानंतर त्यांनी यवतमाळचे पालकमंत्रीपदही भूषवले होते. 

Image may contain: 5 people, people smiling, people standing and outdoor

विविध योजनांसाठी भरीव कार्य 
2014 मध्ये कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकीय कुरघोडीतून त्यांना "उत्तर' मतदारसंघात अपयश पत्करावे होते. मात्र त्यांनी उत्तर मतदारसंघात उभारलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर, बाजीराव साखरे ग्रंथालय, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या विकासाच्या संस्था उभारल्या. सोबतच आंबेडकरी चळवळीचे आंदोलनही त्यांनी सांभाळले. खैरलांजी आंदोलन असो की, आरक्षणाचा कायदा करण्यासाठीचे आंदोलन, बौद्ध विवाह कायदा असो, यात डॉ. राऊत यांची भूमिका मोलाची राहिली आहे. 

चळवळ्या लेकराचे आंदोलन 
नितीन काशीनाथ राऊत या चळवळ्या लेकराच्या आंदोलनाचे चटके मिलमध्ये काम करणाऱ्या आईवडिलांना युवावस्थेपासूनच बसत होते. 1970 च्या दशकात विद्यार्थी फेडरेशनच्या कार्यकारणीतून ते पुढे आले. रस्त्यावर येऊन शिष्यवृत्तीचे आंदोलन केले. पुढे दलित पॅंथरच्या छावणीतून त्यांच्या आंदोलनाला धार आली. मात्र आंबेडकरी अनुयायी विखुरल्याने त्यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून काम सुरू केले.

Image may contain: 9 people, people sitting and child

मात्र तेथेही त्यांचा बाणेदारपणा कायम आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या फाटक्‍या लक्तरातील "माय' उपाशी राहू नये, यासाठी बाबासाहेबांच्या लेकरांची "शिदोरी' होशील हे स्वप्न आई तुळजाबाईने दिले. ते नितीन राऊत यांनी पूर्ण केले. आईचा शब्द पूर्ण करीत दीक्षाभूमीवर येणाऱ्या बाबाच्या अनुयायांची "शिदोरी' ते बनले. 

राजकीय प्रवास 
पहिल्यांदा 1999 मध्ये उत्तर नागपुरातून आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 2004 आणि 2009 मध्ये त्यांनी उत्तर नागपूर शाबूत ठेवले. तीन वेळा आमदार निवडून आल्यानंतर 2014 मध्ये ते पराभूत झाले. मात्र 2019 मध्ये पुन्हा चौथ्यांदा उत्तर नागपूरचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. विशेष असे की, 1979 पासून ते कॉंग्रेससोबत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin raut sworn as cabinet minister in maharashtra