झाडांच्या संगोपनासाठी मनपाचे "ऍप'

file photo
file photo

नागपूर : महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करते. परंतु, ही झाडे जगली की मृत झाली, याबाबत प्रशासन अनभिज्ञ असते. मात्र, आता पालिका वृक्षारोपण, वृक्षांची वाढ याबाबत अद्ययावत माहिती ठेवणारे ऍप विकसित करीत आहे. प्रत्येक नागरिकांना या ऍपद्वारे प्रशासनाला झाडांची स्थिती पाठविता येणार असून या माहितीच्या आधारे झाडांच्या संगोपनावर नजर ठेवली जाणार आहे.
1 जुलै रोजी होणाऱ्या वृक्षलागवड अभियानअंतर्गत महापालिका 82 हजार 500 वृक्षांची लागवड करणार आहे. मनपा, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था आणि लोकांच्या माध्यमातून ही झाडे लावण्यात येणार आहे. या वृक्षांची वाढ, त्याचे संगोपन करणे पालिकेपुढे मोठे आव्हान आहे. पालिकेचे मनुष्यबळही अपुरे आहे. त्यामुळे अनेकदा वृक्षलागवड केल्यानंतर त्याकडे पुरेसे लक्ष देणे शक्‍य होत नाही. दुसऱ्या वर्षी त्याच परिसरात पुन्हा झाडे लावावी लागतात. मात्र, आता पालिकेने झाडांवर नजर ठेवण्यासाठी ऍप विकसित करण्याचा निर्णय घेतला. ऍप निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही प्रारंभ झाला. या ऍपवर दर महिन्यांनी लागवड केलेल्या वृक्षांची माहिती प्रशासनाला मिळणार आहे. अर्थात हे ऍप नागरिकांनी वापरायचे आहे. त्यांच्या परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांची माहिती नागरिक या ऍपवर "अपलोड' करू शकतील. यातून नागरिकांना वृक्षाच्या संगोपनात सहभागाचे समाधान लाभेलच, शिवाय मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनालाही झाडे वाचविण्यासाठी तत्काळ पाऊल उचलणे शक्‍य होणार असल्याचे पालिकेतील सूत्राने नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com