महापालिकेने वेकोलिला ठणकावले

नागपूर : पाहणी करताना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व अधिकारी. कन्हान नदीच्या प्रवाहाला प्रभावित करणारा वेकोलिने तयार केलेला तात्पुरता रस्ता हटविल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेले पाइप.
नागपूर : पाहणी करताना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व अधिकारी. कन्हान नदीच्या प्रवाहाला प्रभावित करणारा वेकोलिने तयार केलेला तात्पुरता रस्ता हटविल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेले पाइप.

नागपूर : कन्हान नदीतून वाळू काढण्यासाठी वेकोलिने पाण्याचा प्रवाहच रोखून नागपूरकरांच्या टंचाईत भर घातली. महापालिकेने ठणकावल्यानंतर नदीतील पाण्याचा प्रवाह रोखणारा रस्ता काढण्यात आला. त्यामुळे कन्हान नदीतून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला.
तामसवाडीजवळील कन्हान नदीच्या पात्रात वाळू उत्खननासाठी रस्ता तयार करून पाण्याचे प्रवाह रोखण्याचा वेकोलिच्या कंत्राटदाराचा प्रताप पुढे येताच गुरुवारी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे व जलप्रदाय समिती सभापती विजय झलके यांनी पाहणी केली. यावेळी जलप्रदाय विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रमोद भस्मे, कनिष्ठ अभियंता मनोज संगीडवार, ओसीडब्ल्यूचे प्रकल्प प्रभारी (कन्हान) दिनेश अटाळकर उपस्थित होते.
कन्हान नदी पात्रातील जागा वेकोलिला लीजवर दिली आहे. कंत्राटदाराला वाळू काढण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून दिल्याचा दावा करण्यात येत आहे. या कागदपत्रांची चौकशी करणे व पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणारी ठिकाणे तातडीने मुक्त करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. नदी व संबंधित जागेची जबाबदारी जलसंपदा विभागाची असल्याने अशा ठिकाणी जलसंपदा विभागाची देखरेख असणे आवश्‍यक आहे. वेकोलिकडे संबंधित जागेची लीज असली तरी त्यांच्या कार्यामुळे शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन बाधित होऊ नये यासाठी मनपाने वेकोलिसह समन्वय साधून कार्य करण्याची गरज असल्याचेही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सांगितले.
नवेगाव खैरी येथून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रासाठी कालव्यातून पाणी सोडले जात असूनही कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील इन्टेकवेलच्या पाण्याची पातळी वाढत नसल्याचे निदर्शनास आले होते. तसेच तामसवाडीजवळील कन्हान नदी पात्रात वेकोलिच्या कंत्राटदाराने वाळू काढण्यासाठी नदीमध्ये पाइप टाकून रस्ता तयार केल्याचेही कार्यकारी महापौरांना आढळले. नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केल्यामुळे त्याचा प्रभाव शहरातील पाणीपुरवठ्यावर पडत होता. याप्रकरणी मनपाने तातडीने कार्यवाही करीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी वेकोलिचे सहायक महाव्यवस्थापक डी. एम. गोखले यांच्याशी चर्चा करून सदर रस्ता तातडीने हटविण्याचे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com