दारूविक्रेत्याविरोधातील कारवाईत कुचराई भोवली, आठवडाभरातच झाली विशेष पथकांची मोडतोड

file photo
file photo

चंद्रपूर : पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दारूविक्रेत्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी चार विशेष पथकांची स्थापना केली. मात्र, आठवडाभरातील या पथकांच्या ‘नेत्रदीपक' कामगिरीने नवे पोलिस अधीक्षक चांगलेच संतापले आणि त्यांनी आता या पथकातील अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या पथकाची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांकडे दिली जाणार आहे.

मागील पाच वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. ती फक्त कागदावरच; तरीही गल्लीबोळात दारू खुलेआम मिळत आहे. दारूविक्रेत्यांच्या अक्षरश: मोहल्ला कमिट्याच निर्माण झाल्या आहेत. यातून दारूविक्रेते आणि पोलिसांचे ‘मधुर' संबंध निर्माण झाले. कोणतेही अधिकारी आले तरी यांच्या संबंधात फारसा फरक पडत नाही, असा आजवरचा अनुभव आहे.

याच संबंधांना तडा देण्यासाठी कार्यभार स्वीकारल्याबरोबर पोलिस अधीक्षकांनी चार पथक स्थापन केले. मात्र, आठवडाभरात केवळ छोट्या कारवाईची औपचारिकता पार पाडली. एका पथकात सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि चार पोलिस शिपायांचा समावेश आहे. त्यांना जिल्ह्यात कुठेही कारवाईचे अधिकार देण्यात आले. परंतु या पथकाने पोलिस अधीक्षकांचा चांगलाच भ्रमनिरास केला.

आता पथकाची फेररचना करणार

त्यामुळेच आज बुधवारी (ता. ७) झालेल्या गुन्हेगारी आढावा बैठकीत त्यांनी या पथकाची फेररचना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या पथकातील अधिकाऱ्यांची चांगलीच नामुष्की ओढवली आहे. जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे जिल्ह्यात कुठेही कारवाईचे अधिकार असतात. त्याच धरतीवर या चार पथकांचे गठण केले होते. परंतु ते सपशेल अपयशी ठरले.

पोलिस अधिकाऱ्यांचे चार पथक; मात्र कारवाई ठोस नाही

रामनगरचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर यांची या पथकातून उचलबांगडी करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद रहांगडाले यांच्याकडे एका पथकाचे नेतृत्व सोपविले होते. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ते रुजूच झाले नाही. त्यांच्याऐवजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक चालुरकर यांच्याकडे जबाबदारी सोपविली. त्यांनाही या पथकातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

बल्लारपूरचे सहायक पोलिस निरीक्षक विनीत घागे यांची या पथकातील नेमणूक मात्र कायम आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत घागे यांच्या नेतृत्वात एकही दखलपात्र कारवाई झाली नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्याकडे एका पथकाचे नेतृत्व होते. मात्र, त्यांच्याकडे आता मनोज अधिकारी हत्याकांडाचा तपास आला आहे. आता भद्रावती येथील श्री. ठाकूर आणि मूल येथील श्री. राठोड या पोलिस उपनिरीक्षकांचा या पथकात समावेश करण्यात येईल.

‘मैत्री’पूर्ण संबंधातूनच निष्क्रियता

पोलिस आणि दारूविक्रेत्यांच्या ‘मैत्री'पूर्ण संबंधातून या पथकांमध्ये निष्क्रियता आली आणि त्यातूनच आता पथकातील काही जणांची हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.
 


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com