इंग्रजी विषयाची पुस्तके मिळेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नागपूर : अभ्यासक्रमात नवे की जुने पुस्तक लावावे याबद्दल अनिश्‍चितता आणि सदस्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचा फटका विद्यापीठातील बीए, बी.कॉम, बी.एसस्सीच्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. बाजारात या तिन्ही शाखेतील इंग्रजी विषयाचे पुस्तकच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर : अभ्यासक्रमात नवे की जुने पुस्तक लावावे याबद्दल अनिश्‍चितता आणि सदस्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचा फटका विद्यापीठातील बीए, बी.कॉम, बी.एसस्सीच्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. बाजारात या तिन्ही शाखेतील इंग्रजी विषयाचे पुस्तकच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कुठलेही पुस्तक समाविष्ट करण्यासाठी ते अभ्यासमंडळाकडे सादर करावे लागते. या मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पुस्तक मान्यतेसाठी शाखेकडे पाठविण्यात येते. यानंतर विद्वत परिषदेसमोर ठेवून त्या पुस्तकाची शिफारस अभ्यासक्रमासाठी केल्या जातो. ही प्रक्रिया होताच, प्रकाशकाला त्याचा साठा शैक्षणिक वर्षाकरिता तयार ठेवण्याची सूचना देण्यात येते. एक पुस्तक जवळपास तीन वर्षासाठी ठेवण्यात येत असते. या पलिकडे त्यास मुदतवाढ देण्याचा अधिकार अभ्यासमंडळांना असतो. सध्या बीए, बी.कॉम, बी.एसस्सी अभ्यासक्रमातील इंग्रजीच्या चार पुस्तकांना तीन वर्षे पूर्ण झाले आहे. मात्र, त्यांना मुदतवाढ दिली काय? याबद्दल प्रकाशकांमध्ये संभ्रम आहे. मुख्य म्हणजे ही पुस्तके अभ्यासक्रमाचा भाग आहे किंवा नाही, याबद्दल साशंकता असल्यानेच त्यांनी पुस्तकांची छपाई केली नसल्याचे समजते. मात्र, याचा फटका तिन्ही अभ्यासक्रमातील इंग्रजी विषयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बसला असून बाजारात पुस्तकेच उपलब्ध नसल्याचे दिसून येते.
याबद्दल अभ्यासमंडळाच्या अध्यक्षा डॉ. ऊर्मिला डबीर यांना विचारणा केली असता, त्यांनी तीन पुस्तके जुन्या अभ्यासक्रमांची असून त्यापैकी एक पुस्तक उपलब्ध आहे असे सांगितले. मात्र, शिक्षक, प्रकाशक आणि दुकान मालकांकडून चालू शैक्षणिक वर्षासाठी आवश्‍यक इंग्रजीची पुस्तके उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.

प्रकाशकांनी विद्यापीठाशी नियमित संपर्क साधावा अशी अपेक्षा आहे. विद्यापीठात पुस्तकांसंदर्भात होणारे निर्णय सर्व प्रकाशकांना कळविण्यासाठी पत्रव्यवहार होणेसुध्दा गरजेचे असून कृतीशील पावले उचलण्याची आवश्‍यकता आहे.
-एक प्रकाशक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No books of English avilable