रिकाम्या हाताने परतले कामगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नागपूर - केंद्रीय खाण व कोळसा मंत्रालयाने वेकोलिच्या कामगारांना डिसेंबर महिन्याचे वेतनाचे 10 हजार रुपये ऍडव्हान्स स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. तसे निर्देशही वेकोलि व्यवस्थापनाला दिले. मात्र, बॅंकांमध्ये ऍडव्हान्सची उचल करण्यासाठी गेलेल्या 40 हजारावर कामगारांना कॅश नसल्याने रिकाम्या हाताने परतण्याची पाळी आली.

नागपूर - केंद्रीय खाण व कोळसा मंत्रालयाने वेकोलिच्या कामगारांना डिसेंबर महिन्याचे वेतनाचे 10 हजार रुपये ऍडव्हान्स स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. तसे निर्देशही वेकोलि व्यवस्थापनाला दिले. मात्र, बॅंकांमध्ये ऍडव्हान्सची उचल करण्यासाठी गेलेल्या 40 हजारावर कामगारांना कॅश नसल्याने रिकाम्या हाताने परतण्याची पाळी आली.
केंद्र सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅंकांमध्ये या नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. या निर्णयाचा दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला. बॅंकांचे सर्व व्यवहार सुरळीत होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. याचा वेकोलि कामगारांनादेखील फटका बसू शकतो. हीच बाब हेरून केंद्रीय खाण व कोळसा मंत्रालयाने कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या वेतनातील 10 हजार रुपये ऍडव्हान्स म्हणून देण्याचे निर्णय घेतला. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणी असून, यात 50 हजारावर कामगार कार्यरत आहे. नागपूर जिल्ह्यात वेकोलिच्या 12 खाणी आहेत. यातील सर्व कामगारांना ऍडव्हान्सची उचल करण्यासाठी स्लिपचे वाटप करण्यात आले. ऍडव्हान्सची उचल करण्यासाठी मंगळवारी (ता. 22) वेळ देण्यात आली. त्यामुळे सर्व कामगार स्लिप घेऊन त्यांचे खाते असलेल्या बॅंकांमध्ये गेले. परंतु, बॅंकांमधून केवळ 10 हजार कामगारांना ऍडव्हान्स मिळाला. तर उर्वरित कामगारांना बॅंकांमध्ये कॅश नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागले. या सर्व कामगारांना ऍडव्हास स्वरूपात 50 कोटी रुपये लागणार होते. परंतु, तेवढी कॅश बॅंकांमध्ये सध्या उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागल्याने कामगारांनी बॅंकावर रोष व्यक्‍त केला.

केंद्रीय कोळसा मंत्रालयाने ऍडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी बॅंकांमध्ये कॅश उपलब्ध करून देण्यासंबंधी उपाययोजना करायला हवी होती. त्याचे नियोजन करूनच कामगारांना ऍडव्हान्सची उचल करण्यासाठी दिवस द्यायला पाहिजे होता. कामगारांच्या सोयीचा निर्णय बॅंकांमध्ये कॅश नसल्याने गैरसोयीचा ठरला.
- शिवपाल यादव,महासचिव हिंद मजदूर सभा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Cash in banks