बडनेरा मतदारसंघ रोजगारनिर्मितीत शून्य

कृष्णा लोखंडे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

बडनेरा (अमरावती) : विकासाच्या योजना अनेक आहेत. तरतुदीही आहेत; मात्र योग्य नियोजन नसल्याने बडनेरा विधानसभा मतदारसंघ विकासापासून दूर आहे. विकासाच्या बाबतीत या मतदारसंघाची व्याख्या भकास, अशी केली जाते. 80 टक्के शहरी व 20 टक्के ग्रामीण असलेल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात रोजगारनिर्मितीचा एकही प्रकल्प निर्माण झाला नाही. दळणवळणासाठी रस्त्यांचा अनुशेष आहे. केवळ राजकारणात गुंतलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे.

बडनेरा (अमरावती) : विकासाच्या योजना अनेक आहेत. तरतुदीही आहेत; मात्र योग्य नियोजन नसल्याने बडनेरा विधानसभा मतदारसंघ विकासापासून दूर आहे. विकासाच्या बाबतीत या मतदारसंघाची व्याख्या भकास, अशी केली जाते. 80 टक्के शहरी व 20 टक्के ग्रामीण असलेल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात रोजगारनिर्मितीचा एकही प्रकल्प निर्माण झाला नाही. दळणवळणासाठी रस्त्यांचा अनुशेष आहे. केवळ राजकारणात गुंतलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे.
परिसीमनमध्ये बडनेरा मतदारसंघातील नांदगाव खंडेश्‍वर हा तालुका वगळण्यात आला व अमरावती शहरातील मोठा भाग जोडून नवीन मतदारसंघ निर्माण झाला. गोपालनगर व सातूर्णा या दोन औद्योगिक वसाहती या मतदारसंघात पूर्वीपासून आहेत. दालमिल, ऑइल मिल, कृषी साहित्यनिर्मिती असे प्रमुख उद्योग येथे आहेत. यातील बरेच उद्योग गेल्या दहा वर्षांत बंद पडले. भातकुली औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. मात्र, मूलभूत सुविधांची वानवा असल्याने येथे एकही उद्योग उभा राहू शकलेला नाही. भूखंड आरक्षित करणाऱ्या उद्योजकांनीही सुविधा नसल्याने या वसाहतीकडे दुर्लक्ष केले आहे. नवीन व मोठे उद्योग स्थापन न झाल्याने रोजगारनिर्मिती शून्य आहे. नांदगावपेठ येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत असल्याने मोठ्या उद्योजकांनी पाठ फिरवली आहे. कुटिर उद्योग स्थापून रोजगार निर्मितीकडे लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे.
अमरावती व भातकुली तालुक्‍यातील 78 गावखेडी या मतदारसंघात आली आहेत. यातील अनेक गावे मुख्य रस्त्यांसोबत जोडल्याच गेली नाहीत. रस्त्यांचा मोठा अनुशेष आहे. तो भरण्यात आतापर्यंत कोणत्याच लोकप्रतिनिधींनी स्वारस्य दाखविले नाही. पांदण रस्त्यांची कामे झालेली नाहीत.
बडनेरा उपनगर या मतदारसंघाचा मोठा भाग आहे. नगर परिषदेला महापालिकेत विलीन करण्यात आले. उपनगराला विशेष दर्जासह विकासाची मोठी आश्‍वासने दिली गेली; पण त्याची पूर्तता झालेली नाही. मोदी रुग्णालयात आजही आरोग्य सुविधांची वानवा आहे. शहरी आरोग्य केंद्रे ओस पडली आहेत. एक लाखाच्या जवळपास लोकसंख्येच्या या उपनगरातील नागरिकांना त्यासाठी जिल्हा सामान्य व जिल्हा स्त्री रुग्णालयात यावे लागते. सिनेगृह नाही. उद्याने विकसित नाहीत. क्रीडांगण नाही. रेल्वेचे मुख्य जंक्‍शन येथे आहे; मात्र सुविधा नाहीत.
अमरावती शहराचा मोठा भाग या मतदारसंघात आहे. रस्त्यांच्या बांधकामापेक्षा प्रवेशद्वार उभारणीवरच अधिक निधी खर्चण्यात आल्याने या भागातही चांगल्या रस्त्यांचा अनुशेष मोठा आहे. वीज वितरण कंपनीची तक्रार केंद्रे ग्राहक संख्येच्या आधारावर नाहीत. शहराचा विस्तार आडवा होत असताना त्याचा विचार करण्यात आला नाही.

सुरक्षेचेही तीनतेरा
सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या मतदारसंघात पोलिस ठाण्यांची संख्या वाढविणे अपेक्षित आहे. मात्र, एकाच ठाण्यावर मोठे क्षेत्रफळ आधारले असून, मनुष्यबळ त्या तुलनेत तोकडे आहे. सीसीटीव्ही लावण्याचा साधा प्रस्तावही नाही. या मतदारसंघातील संवेदनशील ठरलेला भातकुली तहसीलचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. अमरावतीत असलेले हे तहसील कार्यालय नेमके कुठे असावे, यावर दुमत आहे. या मुद्द्यावर राजकीय लढाई सुरू असून ती न्यायालयात पोहोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no employment in badnera constituency