मलकापूर एमआयडीसीत ना सिंचन, ना उद्योग

वीरेंदसिंह राजपूत
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मलकापूर : कोणतेही राज्य, जिल्हा किंवा शहराच्या आर्थिक भरभराटीसाठी उद्योग फार महत्त्वाचे आहे. उद्योगवाढीसाठी औद्योगिक वसाहतीकरिता आवश्‍यक मूलभूत सोई-सुविधा असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. उद्योगास आवश्‍यक कच्च्या मालाचा पुरवठा शेतीमधून होतो, त्या शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी सिंचन लागते. परंतु, मलकापूर मतदारसंघात ना सिंचनाची सोय आहे, ना उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांची. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासात अडसर निर्माण झाला आहे.

मलकापूर : कोणतेही राज्य, जिल्हा किंवा शहराच्या आर्थिक भरभराटीसाठी उद्योग फार महत्त्वाचे आहे. उद्योगवाढीसाठी औद्योगिक वसाहतीकरिता आवश्‍यक मूलभूत सोई-सुविधा असणेदेखील तितकेच गरजेचे आहे. उद्योगास आवश्‍यक कच्च्या मालाचा पुरवठा शेतीमधून होतो, त्या शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी सिंचन लागते. परंतु, मलकापूर मतदारसंघात ना सिंचनाची सोय आहे, ना उद्योगासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांची. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासात अडसर निर्माण झाला आहे.
दीड वर्षापूर्वी म्हणजे 17 डिसेंबर 2017 रोजी बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वितीकरण सोहळ्यानिमित्त जिगावसाठी 3300 कोटी रुपये देण्यात आल्याचे केंद्रीय जलसंधारणमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. 23 वर्षांपासून रखडलेल्या जिगाव प्रकल्पाचे काम त्यानंतरही संथगतीनेच सुरू असून कामातदेखील अनियमितता आहे. या मतदारसंघात सिंचनासोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाची वानवा आहे. येथील शिवशक्ती आदिवासी साखर कारखाना मोडकळीस आला आहे. मलकापूर येथील हुतात्मा वीर जगदेवराव सूतगिरणी अवसायनात निघाली आहे. त्यामुळे रोजगार हिरावल्याने तरुण शहराकडे स्थलांतरित झाले. महामार्गाचीही वाट बिकट झाली आहे.
मलकापूर विधानसभा मतदारसंघात नांदुरा व मलकापूर तालुका येत असून काळ्या कसदार जमिनीची साथ येथील शेतकऱ्यांना लाभली आहे. तरीदेखील सिंचनाचा अभाव असल्याने भरघोस उत्पादन घेता येत नाही. हा परिसर कापसासाठी आशिया खंडात प्रसिद्ध असून येथील दर्जेदार कापसाला सिंचनाअभावी घरघर लागली आहे. यावर पर्याय म्हणून पूर्णा नदीवर जिगाव येथे गेल्या वर्षांपासून महत्त्वाकांक्षी असा जिगाव सिंचन प्रकल्प साकारल्या जात आहे. त्याची संथगती पाहून शेतकरी निराश झाले आहेत.
कापसासोबतच येथे मोठ्या प्रमाणात मका, सोयाबीन व तुरीचे पीक घेतले जाते. त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग होऊ न शकल्याने शेतमालाला योग्य भाव मिळू शकला नाही. मलकापुरात कापसाचे खासगी जीन असले तरी त्याच्या स्पर्धेत सहकारी सूतगिरणी चालू नसल्याने शेतकऱ्यांची लूट केली जाते. मलकापूर येथील हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी अवसायनात निघाली आहे. नांदुरा तालुक्‍यात तर खासगी जीनचीही वानवा आहे. या तालुक्‍याला लागूनच शिवशक्ती आदिवासी साखर कारखाना ऊस न मिळाल्याने बंद पडला आहे. सोबतच या मतदारसंघात मूलभूत सुविधांचाही मोठा अभाव आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला हिवाळ्यापासूनच वणवण भटकावे लागत आहे.
आजही तालुक्‍यातील नागरिकांना छोट्या-मोठ्या उपचारासाठी खामगाव व अकोला गाठावे लागते. यासह अनेक लहान-मोठ्या समस्यांमुळे मतदारसंघाच्या विकासाला ब्रेक लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no industry in malkapur MIDC