विड्याला नाही विम्याचे कवच

leaf plant
leaf plant

डोमरुळ (जि.बुलडाणा) : शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान पाहता खरीप व रब्बी हंगामातील पिकांना विम्याचे कवच दिले आहे. परंतु, अद्यापपर्यंत वर्षांनुवर्षे विड्याच्या पानांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कवच उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे उत्पादन घटत असून, परिणामी पानमळे नामशेष होत आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमध्ये पानमळ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. 

मागील दोन ते अडीच वर्षांपासून सर्वच शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नसून, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे, दूषित हवामानासह वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांमुळे दरवर्षी अनेक पिकांना धोका निर्माण होत आहे. यावर्षी तर अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजी का होईना पण मदत जाहीर झाली. परंतु, परिसरामधील धामणगाव, मासरूळ, तराडखेड, गुम्मी या परिसरातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असून, त्यांना सुद्धा शासनाने मदत करावी या आशेवर शेतकरी बसले आहे. 

खाण्यापासून ते औषधे बनविण्यासाठी उपयोग
नागीण पान हे खेड्यापासून ते शहरापर्यंत रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पान हे पूजेसाठी, खाण्यासाठी, आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणल्या जातो. पान मळ्यात शेतकऱ्यांना खूप मेहनत करत ते मळे टिकविण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. 

शासन दरबारी शेतकऱ्यांच्या चकरा
या पान मळ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी अनेक वेळा परिसतील लागवडधारक शेतकऱ्यांनी शासन दरबारी मागणी करत चकऱ्या मारल्या. परंतु, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यंदा तर शासनाने गांभीर्याने विचार करून पीक विमा संरक्षण द्यावे अशी रास्त मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

विमा योजनेत पानमळ्याचा विचार करावा
अनेक दिवसांपासून पान मळ्याना पीक विमा मिळावा यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. परंतु, त्याचा कोणताच विचार शासनाने केला नाही. इतर पिकांप्रमाणे पान मळ्याचा सुद्धा पीक विमा योजनेमध्ये सहभाग करून घ्यावा जेणेकरून आम्हाला सुद्धा थोडाफार आधार मिळेल.
-डिगंबर सिनकर, शेतकरी, धामणगाव

न्याय मिळण्याची अपेक्षाही फोल
शासनाकडून पीक विमा तर सोडाच पण नैसर्गिक आपत्तीची सुद्धा मदत मिळत नाही. यंदा झालेल्या नुकसानीमुळे मळ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा होती पण ती सुद्धा फोल ठरली आहे. 
-सुकलाल राऊत, शेतकरी, धामणगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com