मराठ्यांनाच काय, कोणालाच आरक्षण देऊ नये - शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

नागपूर - जातीनिहाय आरक्षण बंद केले जात नाही, तोवर आपल्या देशाची प्रगती होणे नाही. आरक्षणाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, अन्यथा आज मराठा समाज आरक्षण मागत आहे, उद्या आणखी दुसरा समाज आंदोलन करेल. मराठाच काय, कुठल्याच समाजाला आरक्षण देऊ नये, असे ठाम मत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.  

नागपूर - जातीनिहाय आरक्षण बंद केले जात नाही, तोवर आपल्या देशाची प्रगती होणे नाही. आरक्षणाचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, अन्यथा आज मराठा समाज आरक्षण मागत आहे, उद्या आणखी दुसरा समाज आंदोलन करेल. मराठाच काय, कुठल्याच समाजाला आरक्षण देऊ नये, असे ठाम मत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.  

एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले असता शंकराचार्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आरक्षणासाठी मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत, यावर मत विचारले असता त्यांनी केवळ व्होट बॅंकेसाठी सर्व खटाटोप सुरू असल्याचे सांगितले. राज्य शासनाने निर्णय घेण्यापूर्वी त्याचा शेवट काय होईल, याचाही विचार करावा. केवळ ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री आहे म्हणून मोर्चे काढून टार्गेट करणे अयोग्य आहे. हरियानातील जाट समाज, राजस्थानमधील गुर्जर, गुजरातमध्ये पटेल आणि महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागत आहे. सर्व जाती एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. माणसाने स्वतःची प्रगती जरूर करावी. मात्र, दुसऱ्याची रोखू नये, असा सल्ला देऊन शंकराचार्यांनी आरक्षणाच्या मागणीच्या माध्यमातून नेमका हाच प्रयत्न होताना दिसत असल्याचे सांगितले. 

जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर लायक उमेदवारांची संधी मारल्या जाईल. सोबतच संधी घेणाराही निष्क्रिय बनेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राने गोहत्या बंदीचा कायदा केल्याने त्यांनी अभिनंदन केले. मदरशात कुराण आणि ख्रिस्ती शाळांमध्ये बायबलचे धडे दिले जातात. त्यांना कोणी धर्मवेडे ठरवत नाही. आक्षेपही घेतला जात नाही. भारतात आपल्याच धर्माच्या शिकवणीला विरोध केला जातो. असा प्रयत्न केल्यास प्रतिगामी, धर्मांध म्हणून ठपका ठेवला जातो. रामायण आणि महाभारत भारताचे पवित्र ग्रंथ आहेत. ते केवळ ग्रंथ नव्हेत, तर जीवनपद्धती आहे. यामुळे भारतानेसुद्धा रामायण आणि महाभारताचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असेही शंकाराचार्य म्हणाले.

Web Title: No one should give reservation