...सबब रुग्णाला न्यावे लागते झोळीत! (व्हिडिओ)

संजय जाधव
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

पालकमंत्र्यांनी येऊन पाहावे
रस्त्याअभावी पेशंटला दवाखान्यात नेता येत नाहीत. अगदी बैलगाडीही पावसाळ्यात गावात येऊ शकत नाही. पालकमंत्र्यांनी स्वत: येऊन आमची परिस्थिती पाहावी आणि आम्हाला सुविधा निर्माण करून द्यावी.
- शेषराव शेगोकार, गावकरी 

बुलडाणा : आपला भारत देश आता विकसीत आणि आधुनिक देशांशी स्पर्धा करू लागला आहे. मात्र, अजूनही देशात अशी काही गावे आहेत, जिथं साध्या रस्ता, पाणी अशा मूलभूत सुविधा नाहीत. त्यापैकीचे एक म्हणजे, बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील गोळेगाव खुर्द हे गाव. या गावाला अजून पक्का रस्ताच नाही. त्यामुळे गावातील कोणी आजारी पडले तर, त्याला चक्क घोंगडीची झोळी करून डॉक्टरकडे न्यावे लागते!

शेगाव तालुक्यात आतील भागात असलेले गोळेगाव खुर्द या गावाचे 1969मध्ये पुनर्वसन झाले. तेव्हापासून अजूनपर्यंत या गावाला रस्ताच नाही. विशेष म्हणजे शेगावपासून हे गाव फक्त 15 किलोमीटरवर आहे. होते मात्र अद्यापपर्यंत या गावाला पक्का रस्ता नसल्याने येथील नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहे. 
या गावाचा समावेश कामगार मंत्री आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या जळगाव जामोद मतदारसंघात येते. मात्र या मंत्र्यांच्या गावातही प्रशासनाला प्राथमिक सोयीसुविधा पोहोचविता आलेल्या नाहीत.

या गावातील सर्व कुटुंबे बौद्ध समाजाची आहेत. सर्वच पायाभूत सुविधांचा अभाव सहन करत त्यांना जगावे लागत आहे. गोळेगाव खुर्द हे गाव शेगाव-वरवट रोडवरून भोनगाव फाट्यावरून पूर्वेला तीन किलोमीटर अंतरावर पुनर्वसीत झालेले आहे. गावाचे पुनर्वसन झाल्यापासूनच या गावाला आरोग्य, शिक्षण, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा आजही उपलब्ध झालेल्या नाहीत.

पालकमंत्र्यांनी येऊन पाहावे
रस्त्याअभावी पेशंटला दवाखान्यात नेता येत नाहीत. अगदी बैलगाडीही पावसाळ्यात गावात येऊ शकत नाही. पालकमंत्र्यांनी स्वत: येऊन आमची परिस्थिती पाहावी आणि आम्हाला सुविधा निर्माण करून द्यावी.
- शेषराव शेगोकार, गावकरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No road in Buldana village Golegaon