"नोटा'तून इशारा कोणाला? राज्यकर्त्यांसाठी धोक्‍याची घंटा

"नोटा'तून इशारा कोणाला? राज्यकर्त्यांसाठी धोक्‍याची घंटा

नागपूर : "नोटा'चे मताधिक्‍य यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत चांगलेच वाढले असल्याने "नोटा'चे बटण दाबवणाऱ्यांचा इशारा नेमका कुणाला, असा सवाल आता उपस्थित होऊ लगला आहे. ही धोक्‍याची घंटा असून मतांच्या राजकारणासाठी लांगुनचालन भविष्यात चालणार नाही, असेच यातून ध्वनित होत असल्याचे दिसून येते. 
मराठा समाजाला आरक्षण देताना खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात केल्याने "सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चा जन्म झाला आहे. राज्यभर आंदोलने झाली. न्यायालयात दावे दाखल करण्यात आले. आजही याविरोधात असंतोष घुमसत आहे. "सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'च्या आंदोलकांनी विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली होती. "नोटा'चा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. एका गटाने आंदोलनाचा आणि निवडणुकीचा संबंध नसल्याचे सांगून "नोटा' दाबू नका, असे आवाहन केले होते. दुसरा गट नोटावर ठाम होता. प्रचाराच्या धबडग्यात हा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसत होते. मात्र, मतमोजणीनंतर नोटाला मोठ्या प्रमाणात मत पडल्याचे दिसून आले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचाराच्या भाषणांमध्ये कोणावरी अन्याय होणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी दरवर्षी टप्प्याटप्प्याने आवश्‍यकतेनुसार जागांमध्ये वाढ केली जाईल, याचा आवर्जून उल्लेख केला. यातून त्यांना नोटाचा वापर करू नका, हेच सुचवायचे होते. विधानसभा निवडणुकीतील नोटांचे प्रमाण वाढले, याचा संबंध अनेक राजकीय अभ्यासक सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीशी जोडत आहेत. परंतु, आमची चळवळ अराजकीय असून, वाढलेल्या आरक्षणाविरोधात आम्ही जनजागृती करतो, नोटांशी आमचे काहीही संबंध नाही. असेल, तर हा सरकारविरोधी नाराजीचा सूर असावा, असे स्पष्टीकरण सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांत 28 हजार 496 मतदारांनी "नोटा'चा मार्ग अवलंबवला आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा हा आकडा 12 हजारांनी जास्त असून, विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघदेखील यातून सुटलेला नाही. सध्या या चळवळीची सूत्रे डॉ. संजय देशपांडे यांच्याकडे असून, सचिन पोशट्टीवार, डॉ. अनुप मरार यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ ही चळवळ राबवीत आहेत. 
मतदारांनी नाराजी व्यक्‍त केली 
जुलै महिन्यात "सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन'च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी अठरा मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. विशेष म्हणजे मागण्या पूर्ण होतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली होती. मात्र, या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने, आरक्षणाचा फटका सोसत असलेल्या मतदारांमध्ये नाराजी आहे. ती त्यांनी या मार्गाने व्यक्‍त केली असल्याचे बोलले जात आहे. 

आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही किंवा बाजूने नाही. नागरिक सुशिक्षित आहेत. त्यांनी सदसद्विवेकबुद्धीने मतदान करावे, एवढेच आम्ही आवाहन केले होते. आमच्यासोबत मोठा जनसमुदाय येतो आहे. आगामी काळात राजकीय नेतृत्वास विश्‍वासात घेऊन मागणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. 
-संजय देशपांडे, अध्यक्ष, सेव्ह मेरिट सेव्ह नेशन. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com