नोटाबंदीमुळे कुलींची कंबरमोड 

NOTE-BAN
NOTE-BAN

नागपूर - नोटाबंदीचा गरिबांवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, प्रवाशांचे ओझे उचलून चरितार्थ भागविणाऱ्या कुलींचे नोटाबंदीमुळे कंबरडेच मोडले आहे. दिवसाचे दीडशे रुपयेही मिळणे कठीण झाले असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कुली बांधवांपुढे उभा ठाकला आहे. 

नोटाबंदीला उणेपुरे दोन महिने पूर्ण होत असतानाही बाजारात मुबलक नोटा उपलब्ध नाहीत. अजूनही एटीएम किंवा बॅंकेतून मर्यादित पैसे मिळताहेत. त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला. कुलीबांधवांवर सर्वाधिक परिणाम झाला असल्याचे दिसून येते. नोव्हेंबरच्या मध्यापासून जानेवारी मध्यापर्यंत लग्नसराई असते. शिवाय पर्यटनाला जाणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. यामुळे कुलींच्या दृष्टीने हा सुगीचा काळ असतो. देशाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीत येत असला तरी कुली बांधवांसाठी जुन्या उसनवारीची परतफेड आणि भविष्याच्या तडजोडीसाठी हाच काळ महत्त्वपूर्ण असतो. यंदा मात्र नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कुली बांधवांची पूर्णत: निराशा झाली. एरवी याच काळात आठशे ते नऊशे रुपये रोज त्यांच्या हातात पडायचे. यंदा दीडशे रुपयेसुद्धा पडणे कठीण झाले आहे. नोटाबंदी हेच त्यामागचे कारण असल्याचे कुलींचे मत आहे. प्रवाशांकडे मर्यादित पैसा असतो. पुढे गरज पडेल म्हणून पै-पै वाचविण्यावर भर दिला जात आहे. वृद्ध व्यक्तीही स्वत:चे सामान स्वत:च वाहून नेत आहे. व्हीलअसलेल्या ब्रिफकेस आणि बॅगमुळे साहित्याचे वहन सोपे झाले. कुली बांधवांचा व्यवसाय मात्र बुडाला आहे. रोटेशननुसार कुलींना रात्रपाळी ही करावी लागते. पण, रात्रपाळीत असणाऱ्या बरेचदा रिकाम्या हातानेच घरी परतावे लागते. या स्थितीत घरच्या सदस्यांचे बोट भरणेच कठीण झाले असताना मुलांना शिकवायचे कसे असा प्रश्‍न कुली बांधवांनी उपस्थित केला. 

कुली पूर्णत: तुटला : अब्दुल माजीद 
नवीन सरकारचे बरेच निर्णय चांगले असले तरी नोटाबंदीचा निर्णय कुलींच्या दृष्टीने अत्यंत विघातक ठरला. नोटाबंदीनंतर उत्पन्नात 75 टक्‍क्‍यांपर्यंत तूट आली असून, कुली पूर्णत: तुटला आहे. ऐन उमेदीच्या काळातच व्यवसाय बुडाला. भविष्यात परिस्थिती पूर्वपदावर आली तरी आर्थिक दृष्टीने कुली वर्षभार मागे गेला आहे, अशी भावना मध्य रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजीद यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com