आरोग्य अधिकारी, अभियंत्यांसह 15 जणांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : स्थायी समिती, आयुक्तांची दिशाभूल करणे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह 12 कार्यकारी अभियंते व दोन झोनल आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. एकूण 15 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सांगितले.

नागपूर : स्थायी समिती, आयुक्तांची दिशाभूल करणे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह 12 कार्यकारी अभियंते व दोन झोनल आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले. एकूण 15 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सांगितले.
स्थायी समितीची बैठक शुक्रवारी महापालिकेत पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीने विकासकामांचा धडाका लावला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी झोनच्या कार्यकारी अभियंत्यांना कंत्राटदारांनी सुरू केलेली कामे, अर्धवट कामे, कार्यादेश दिलेली कामे याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, लक्ष्मीनगर, धंतोली, लकडगंजसह चार झोनच्या कार्यकारी अभियंत्यांनीच अहवाल सादर केला. अहवाल सादर न करणाऱ्या सहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
याशिवाय महिन्याभरापूर्वी शहरातील खड्ड्यांचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले होते. मात्र, एकाही कार्यकारी अभियंत्याने स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश गांभीर्याने घेतले नाही. हॉटमिक्‍स विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह दहाही झोनच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस देण्यात येणार आहे. याशिवाय गणेश विसर्जनाच्या तयारीत हयगय केल्याप्रकरणी नेहरूनगर व लकडगंज झोनच्या झोनल आरोग्य अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे पोहाणे यांनी नमूद केले. आरोग्य विभागाने शहरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडला होता. दुरुस्तीसाठी 1 कोटी 41 लाखांचे प्राकलन तयार केले. मात्र, हा खर्च कुठून केला जाईल, याबाबत चुकीची माहिती प्रस्तावात देण्यात आली. मुळात स्वच्छतेसंबंधी कामे असल्याने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आलेल्या निधीतून हा खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रस्तावात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी आरोग्य अधिकारी स्वच्छता डॉ. सुनील कांबळे यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्याचे पोहाणे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to 15 people, including health officials, engineers