"नर्सरी बचाव'साठी आता पर्यावरण रक्षण संघर्ष समिती

सोपान बेताल
बुधवार, 4 डिसेंबर 2019

  • झाडे तोडून कारखान्याला विरोध
  • निर्णयाविरुद्ध आवाज उचलण्याचा निश्‍चय

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) ः "नीलडोहची नर्सरी होणार हद्दपार' या शीर्षकाची बातमी दै.सकाळमधून प्रसिद्ध होताच परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यांनी नर्सरीकडे धाव घेऊन प्रशासनाचा निषेध केला. हिंगणा एमआयडीसीतील कार्यालयातील अधिकारी नर्सरीत दाखल झाले. येथे झाडे तोडून कारखाना होऊ घातल्याचे दृश्‍य पाहून तेही अवाक झाले. शेवटी नर्सरीत कारखाना थाटण्याचे काम उच्च स्तरावरून सुरू करण्यात आल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक नागरिकांनी पर्यावरण संरक्षण समिती स्थापन करून या निर्णयाविरोधात आवाज उचलण्याचा निश्‍चय केला.

नागरिकांचा श्‍वास कोंडणार
नीलडोह-डिगडोह या एमआयडीसी परिसरातील मोठ्या ग्रामपंचायती आहेत. येथील आठवडी बाजारासाठी एमआयडीसी जागा देत नसल्याने हिंगणा मार्गावरील आयसी चौकातच आजही ऐन रस्त्यावर अडचणीत आठवडी बाजार भरतो. या दोन्ही ग्रामपंचायत परिसरात नीलडोहची एकमेव नर्सरी असून मागील 70वर्षांपासून नीलडोहच्या नर्सरीमुळे नागरिकांना प्रदूषणमुक्‍त श्‍वास घेता येतो. पण, आता हा परिसर नर्सरीपासून मुकणार असल्याने त्यांचा श्‍वासही कोंडणार असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. परिसरात अनेक भूखंड रिक्‍त असताना नर्सरीचाच भूखंड का विकला, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही मागणी परिसरात जोर धरत आहे.

समिती आवाज उचलणार
बाधकांमासाठी बाधा ठरणारी नर्सरीतील झाडे निदर्यतेने कापण्यात आली आहेत. कंपनीचे बांधकाम झपाट्याने सुरू आहे. पण, आजही जो भाग झाडांनी व्यापला आहे, त्या जागी विविध जातीचे पक्षी वास्तव्य करतात. एमआयडीसीतील प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी एमआयडीसीजवळ काय कार्यक्रम आहे, हा प्रश्‍न समितीच्या माध्यमातून शासनाला विचारण्यात येणार आहे. माजी सरपंच अशोक घुगरे, सामाजिक कार्यकर्ते बाबूराव येरणे, माजी जि. प. सदस्य गोवर्धन प्रधान, माजी उपसरपंच राकेश दुबे, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कडू, दयाराम भजनकर, देवेंद्र बडगे, विठ्ठल हुलके, राकेश बंडे, ओमप्रकाश वैद्य, राकेश वैद्य व इतरही पर्यावरणप्रेमी आता संघर्ष समिती स्थापन करून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी कामाला लागले आहेत.

अधिकाऱ्यांनी केली पाहणी
"सकाळ'मधून बातमी प्रसिद्ध होताच अधिकारी स्वतः नीलडोह येथील नर्सरीत आले. काही लोकप्रतिनिधींना माहिती मिळताच तेही नर्सरीत गोळा झाले. अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता अधिकारी हा प्रकार पाहून अवाक्‌ राहिले. उत्तर मिळाले की हे काम उच्च स्तरावरून झाले असून आम्हाला काहीच करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the Environmental Protection Struggle Committee for "Nursery Rescue"