अत्यावश्‍यक सेवांची दुकाने राहणार सुरू

Now essential services & shops are open
Now essential services & shops are open

अमरावती :  राज्य शासनाच्या आदेशान्वये नागरिकांच्या सुविधेसाठी काही अत्यावश्‍यक सेवा व मूलभूत सुविधांना गुरुवारपासून (ता.7) सूट देण्यात आली. सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत मुख्य बाजारपेठ, मॉल वगळता कॉलनी, गृह संकुल व गल्लीतील दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. एखादे दुकान सुरू किंवा बंद करण्याबाबत निर्णयाचे अधिकार महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी यांना असतील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू ठेवता येतील.

दर आठवड्यात शनिवारी दुपारी 3 पासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे व या काळात दुकानांची साफसफाई, स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निर्गमित केले. ग्रामीण क्षेत्रातील सर्व प्रकारची बांधकामे करण्यास मुभा असेल. शहरी भागात महानगरपालिका व नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रात सुरू असलेली बांधकामे पूर्ण करता येतील. मजुरांची वाहतूक होणार नाही या अटीवर काम सुरू राहील. नविनीकरण उर्जा प्रकल्पाचे बांधकाम करता येईल.


ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या औद्योगिक उपक्रमांना परवानगी असेल. शहरी भागात औद्योगिक वसाहती व औद्योगिक टाऊनशिपमधील उद्योग नियंत्रित प्रवेश ठेवून सुरू करता येतील. विशेष आर्थिक क्षेत्र, औद्योगिक वसाहत व वस्ती, जीवनावश्‍यक वस्तु निर्मिती उद्योग, त्यांना पुरवठा करणारे साखळी उद्योग, माहिती व तंत्रज्ञान संबंधित उपकरणे निर्मिती उद्योग, पॅंकीग मटेरिअल उद्योग यांना परवानगी असेल. जीवनावश्‍यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, कच्चा माल तसेच सतत प्रक्रिया करावे लागणारे उद्योग आणि त्याची पुरवठा साखळी आवश्‍यक असणारे उद्योग. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आवश्‍यकतेप्रमाणे पासेस निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व उद्योग शिफ्टनिहाय व सामाजिक अंतराचे नियम पाळून सुरू करण्याचे निर्देश आहेत.


शहरी भागातील महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत हद्दीतील मॉल्स बाजार संकुल, व बाजारातील अत्यावश्‍यक वस्तु विक्री करणाऱ्या दुकांनाव्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे कंटोन्मेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची जीवनावश्‍यक व बिगर जीवनावश्‍यक स्वतंत्र दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सुरू करता येतील. गल्लीत 5 पेक्षा जास्त दुकाने असू नये. घरपोच सेवा देण्याबाबत जास्तीतजास्त कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून कुठेही गर्दी होणार नाही. दुकाने सुरू करताना 5 पेक्षा जास्त ग्राहक एका वेळी नसणे, दुकानासमोर वर्तुळ आखणे, परिसराचे दर 2 तासांनी निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, हॅंडवॉश, सॅनीटायझरचा वापर करणे, दुकानाची वेळ व दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. रुग्णालये, औषधी दुकाने, पूर्णवेळ सुरू राहतील.

मिठाई व खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्ये केवळ पार्सलची व्यवस्था असावी. जास्तीतजास्त ग्राहकांना घरपोच सेवा मिळण्याकरिता व दुकाने, गोदाम सुरू ठेवण्याबाबत आयुक्त महानगरपालिका, मुख्याधिकारी नगर परिषद, नगरपंचायत यांनी नियोजन करावे व आवश्‍यकतेप्रमाणे पासेस निर्गमित कराव्यात, खासगी कार्यालये ही 33 टक्के कर्मचारी आस्थापनेसह सुरू ठेवावी इतर कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे, असे निर्देश आहेत.
कृषियंत्रणेची दुकाने सुरू ठेवण्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून परवानगी प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी व आवश्‍यकतेप्रमाणे पासेस निर्गमित कराव्यात.
बॅंका सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, यांची वाहतूक वितरण, साठवण व विक्री सुरू राहील.

लॉकडाउनच्या कालावधीत प्रतिबंधीत सेवा

शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग, सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्‍स, व्यायामशाळा व क्रीडा कॉम्प्लेक्‍स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, सामाजिक धार्मिक कार्ये, सांस्कृतिक, शैक्षणिक, करमणूक, खेळ, मेळावे पूजेची ठिकाणे, सलून, स्पा, कटिंग, ब्यूटी पार्लर बंद राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com