आता ग्रामपंचायतस्तरावर पीक कापणी प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सरासरी उत्पादकता मंडळाची गृहीत धरली जाते. पर्यायाने काही गावांतील उत्पादकता कमी असली तरी त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येतात. 

अमरावती : महसूल मंडळनिहाय पीक कापणी प्रयोगाला प्रथमच छेद देत आता ग्रामपंचायतस्तरावर पीक कापणी प्रयोग घेण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविला जात आहे. या पथदर्शी कार्यक्रमात जिल्ह्याचा हरभरा पिकासाठी समावेश करण्यात आलेला आहे.

उंबरठा उत्पन्न निश्‍चित केले जाते

खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे कापणी प्रयोग महसूल मंडळनिहाय घेतले जातात. त्यावरून त्या मंडळातील सरासरी उत्पादकता, उत्पन्न आणि त्यावर आधारित उंबरठा उत्पन्न निश्‍चित केले जाते. दुष्काळी परिस्थितीत पीकविम्याची भरपाई देण्यासाठी उंबरठा उत्पन्न गृहीत धरले जाते. मात्र महसूल मंडळात अनेक गावांचा समावेश असतो आणि सरासरी उत्पादकता मंडळाची गृहीत धरली जाते. पर्यायाने काही गावांतील उत्पादकता कमी असली तरी त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येतात. 

संवेदना मेल्या की काय? अमरावतीत नकोशीला सोडून पलायन

पथदर्शी कार्यक्रम

कृषी विभागातर्फे यावर्षी पथदर्शी कार्यक्रम म्हणून रब्बी हंगामातील काही पिकांचे ग्रामपंचायतस्तरावर पीक कापणी प्रयोग घेतले जाणार आहे. त्यासाठी विभागातील एका जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. नागपूर, अहमदनगरसह विभागातील अमरावती जिल्ह्याचा (हरभरा पिकासाठी) कार्यक्रमात समावेश आहे. पूर्वीच्या व्यवस्थेत हरभरा पिकाचे महसूल मंडळात बारा कापणी प्रयोग घेतले जात होते. 

भविष्यातील निर्णय अवलंबून

ग्रामपंचायत स्तरावर पिकाची उत्पादकता समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आहे. ग्रामपंचायत स्तरावरील पीक कापणी प्रयोग यशस्वी ठरल्यास त्या आधारावर भविष्यातील निर्णय अवलंबून राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात यावर्षी 1 लाख 75 हजार हेक्‍टर क्षेत्रात हरभरा लागवड अपेक्षित आहे.

देवेंद्र फडणवीस हाजीर हो...

कृषी सहायकांना प्रशिक्षण

जिल्ह्यातील 860 ग्रामपंचायतींपैकी ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात हरभरा पिकाची लागवड होईल. त्या प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागातर्फे एकूण चार प्रयोग होतील. त्यासाठी कृषी सहायकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now experiment the crop harvest on the Gram Panchayat level