आता अमरावतीतूनही होणार विमानांचे 'उडान' (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

- अमरावतीतून चार शहरांसाठी विमानसेवेचे नियोजन.

अमरावती : हवाई चप्पल घालणाऱ्याला हवाई सफर करता आली पाहिजे, याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या 'उडान' योजनेंतर्गत राज्यातील विमानतळांचा विकास राज्य सरकारने हाती घेतला आहे. विमानतळाच्या सुविधेमुळे राज्यात विकासाला गती मिळणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती येथे बोलताना व्यक्त केले. 

अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. या विमानतळांच्या विस्तारीकरणामुळे पश्चिम विदर्भाचा चेहरामोहरा बदलणार असून, अनेक नवीन उद्योग या ठिकाणी येऊन औद्योगिक विकासाला चालना मिळेल. बेलोरा विमानतळावरुन अमरावती-मुंबई अशी विमानप्रवासाला सुरवात होणार आहे. नाईट लँडिंगची सुविधाही कार्यान्वित करण्यात येणार आहे. यापुढे अमरावतीवरुन देशातील चार महत्वाच्या शहरांना उड्डाण होईल. यादृष्टीने काम करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

तसेच या सर्व विकासात्मक घडामोडीमुळे अमरावती जिल्ह्याचे नाव विमानचालनच्या नकाशावर नोंदले जाणार आहे. पश्चिम, विदर्भात अस्तित्वात असलेल्या अमरावती, अकोला व यवतमाळ या तीन विमानतळांचा विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील विमानतळ विकसित होत असताना अकोला आणि यवतमाळ येथीलही विमानतळांचा विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the flight will fly through Amravati says Devendra Fadnavis