अबब! गोंदियात शौकिनांना रस्त्यारस्त्यावर मिळतो गांजा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

अंमली पदार्थांमुळे युवक कचाट्यात सापडला आहे. गोंदियाच्या गल्लोगल्ली गांजा मिळत असल्याने युवक या व्यसनाच्या आहारी गेला आहे. हा गांजा कुठून येतो, गांजाची तस्करी वाढली आहे. शहरातून पोलिसांनी 32 किलो गांजा जप्त केला आहे. आंतरराज्यीय तस्करांनाही अटक केली आहे.

गोंदिया : जिल्ह्यात आंतरराज्यीय गांजा टोळीने धुमाकूळ घातला आहे. शहरातील काही रस्त्यांवर गांजा मिळतो. यात अनेक युवक गांजाच्या आहारी गेले आहेत. परिणामी पोलिसांवर दबाव वाढत आहे. नुकताच पोलिसांनी छापा टाकून 32 किलो गांजा जप्त केला.

यातून शहरात रस्त्यारस्त्यावर गांजा मिळत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. येणाऱ्या काळात टोळीविरोधात पोलिस कोणती भूमिका वठवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चारचाकी वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग करीत शहर पोलिसांनी या वाहनातून 32 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई येथील निर्मल टॉकीजसमोरील रस्त्यावर सोमवारी करण्यात आली.

या घटनेत चालक वरिंदरसिंह कुलदीपसिंह (वय 30, वीर सावरकरनगर, हिरापूर टाटीबंध, रायपूर), शंक पंचू मिश्रा (वय 41, रा. केवट गल्ली, सागरपारा, सिंधी शाळेच्या मागे, रायपूर), जितेंद्रकुमार बच्छुलाल श्रीवास्तव (वय 40, रा. वॉर्ड क्रमांक 19, छोटा रामनगर, रायपूर) व प्रकाश बारकू बोरकर (वय 28, रा. कुंभारटोली फार्मसी कॉलेजजवळ, आमगाव) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

उपरोक्‍त आरोपी चारचाकी वाहनाने (सीजी.04/बी.1063) रायपूरकडून गोंदिया शहरात गांजा विक्रीकरिता आणत आहेत, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
दरम्यान, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, पोलिस हवालदार मिश्रा, पोलिस नायक उईके, बिसेन, पोलिस शिपाई विठ्ठले, शहारे यांनी फुलचूर नाक्‍याकडून जयस्तंभ चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून नाकाबंदी केली.

त्यांना चारचाकी वाहन (क्रमांक सीजी.04/बी.1063) येताना दिसले. त्यांनी वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाहन न थांबविता पुढे निघून गेल्याने वाहनाचा पाठलाग केला.

वाहनातून गांजा जप्त
येथील निर्मल टॉकीजसमोर वाहन थांबविले. चौकशी केली असता वाहनाच्या मागील सीटवर हिरव्या, पिवळ्या रंगाची एक पोती व एक राखडी रंगाची पोती दिसून आली. तिथे 32 किलो 250 ग्रॅम गांजा आढळला. याची किमत 2 लाख 88 हजार 900 रुपये, मोबाईल व वाहन असा एकूण 6 लाख 7 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now! In Gondia, amateurs get ganja on the road