आता तरी महायुतीने सरकार स्थापन करावे : कॉंग्रेसच्या नेत्याने केले आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

यवतमाळ : महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेचा कौल देऊन 11 दिवस उलटले; तरीही मुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती मिळविण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये टोकाचे वाद सुरू आहेत. सध्या तरी हे वाद सुटलेले नाहीत. महायुतीने सरकार लवकर स्थापन करावे, यासाठी कॉंग्रेसचे नेते, माजी शिक्षणमंत्री आणि राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार प्रा. वसंत पुरके यांनी सोमवारी (ता. 4) सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळात राळेगाव येथे धरणे आंदोलन केले.

यवतमाळ : अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता तरी महायुतीने भांडणे थांबवावी, अशी मागणी प्रा. वसंत पुरके यांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी सद्यःस्थितीत असलेले सरकार हे काळजीवाहू सरकार आहे, याची जाणीव करून दिली. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी निर्णय घेताना अनेक अडचणी येत आहेत. आर्थिक विषयांत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांनी एकत्र येऊन ते घ्यायचे असतात. त्यासाठी नवीन सरकार तत्काळ स्थापन होणे गरजेचे आहे. आधी अतिवृष्टीने आणि आता परतीच्या पावसाने शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे. अशा वेळी खुर्चीसाठी भांडत राहणे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. जनतेचा कौल प्राप्त झालेल्या नेत्यांना हे शोभत नाही. जनतेच्या त्यांच्यावरील रोष दिवसागणिक वाढतो आहे. त्याचा उद्रेक होण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला गती द्यावी. शेतकऱ्यांवर ओढावलेले संकट लक्षात घेता महायुतीच्या नेत्यांनी आपसातील भांडणे मिटवून लवकरात लवकर सत्ता स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रा. पुरके यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the Mahayuti should form a government: agitation by Congress leader