अबब! नवेगावबांध जलाशयात वाढतेय प्रदूषण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

- बुडीत क्षेत्रातील अतिक्रमण ताबडतोब हटवा
- नागरिकांनी केली मागणी

नवेगावबांध (गोंदिया) : चारशे पन्नास वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या नवेगावबांध जलाशयाला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. तलावाच्या बुडीत क्षेत्रात शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. परिणामी, तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. हे अतिक्रमण ताबडतोब हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नवेगावबांध (गोंदिया) : केवळ शेतीसाठी सिंचन व्हावे, याकरिता या तलावाची निर्मिती झाली. तलावाच्या बुडीत क्षेत्रात शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. गट क्रमांक 1292 असून, या तलावाचे बुडीतक्षेत्र आराजी 1227.66 हेक्‍टर आर. एवढे आहे. या जलाशयाचे पाणलोट क्षेत्र 5698 हेक्‍टर आर. एवढे आहे. 1034 हेक्‍टर आर. बुडीत क्षेत्र आहे.
1971 ला महाराष्ट्र शासनाने येथील निसर्ग वैभव व नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा परिसराला दिला. रामपुरी, एलोडी, जांभळी, पवनी, धाबेटेकडी आणि रांजीटोला, कोहळीटोला या गावांतील लोकांनी या बुडीत क्षेत्रात अतिक्रमण केल्यामुळे आता फक्त 800 हेक्‍टर बुडीत क्षेत्र उपलब्ध आहे. 1770 हेक्‍टर आर. जंगल क्षेत्रातून तलावात गाळ वाहून येतो. या शंभर वर्षात विचार केला तर आजमितीला या तलावात 44,2500 घनमीटर गाळ साचला असावा, असा धक्कादायक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
परिणामी या तलावातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे सिंचन व पाण्याच्या टंचाईचा सामना परिसरातील जनतेला करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षापासून या तलावावर अवलंबून असलेल्या नवेगावबांधसह पाच निस्तारहक्क गावातील शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामासाठी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही.
तसेच यावर्षी उन्हाळ्यात नवेगावबांध परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवली. तलाव, बोड्या, बोअरवेल, विहीर यातील पाणी आटले होते. मृतसाठाच शिल्लक राहिला होता. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागला होता. कालव्यातून पाणी निघत नसल्यामुळे या मृत साठ्यातून मोटारपंप लावून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नवेगावबांधवासींना करण्यात आला होता. सिंचन व पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस जाणवत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पुढे परिसरात सिंचन व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

पाणीसाठ्यात घट
दुसरीकडे तलावाच्या बुडीत क्षेत्रात किनाऱ्यालगतच्या गावांतील लोकांनी अतिक्रमण करून शेतजमिनी काढल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा साठा कमी होण्याबरोबरच शेतामध्ये पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी, रासायनिक खते, कीटकनाशक औषधी शेतकरी वापरत आहेत. हे कीटकनाशके तलावातील पाण्यात मिसळून प्रदूषण होत आहे. त्यामुळे तलावातील पाणी दिवसेंदिवस दूषित व विषयुक्त होत आहे. दरम्यान, तलावाच्या बुडीत क्षेत्रातील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी नवेगावबांध फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास बोरकर यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now! navegaoanbandh Water pollution is increasing in reservoirs