आता पोलीस दलात हजारोंना संधी

police
police

अमरावती : गृह खात्यातील रिक्तपदे भरण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, सात ते आठ हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती केली जाणार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दर्यापूर येथे सांगितले.
लोकनेते स्व. जे. डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे होते. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, जि. प. सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजित देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.
गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, पोलिस भरतीसह विविध स्पर्धापरीक्षांसाठी ग्रामीण तरुणांनी तयारी करून अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. गत काही काळात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अवैध सावकारी, नक्षलवाद यांना आळा घालण्यासाठी शासन महत्त्वाची पावले उचलणार आहे. ऑल इंडिया क्राईम रिपोर्टनुसार विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये. स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांनी दर्यापूर परिसरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वांनी समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, बालमजुरी रोखण्यासाठी व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी भरीव कार्यक्रम राबविण्यात येईल. बालके ही उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सकारात्मक निर्मितीकडे वळविण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या. आमदार श्री. वानखडे, श्री. तसरे, श्री. काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कांचनमाला गावंडे यांनी केले.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com