कोरोना रुग्णांच्या सेवेत आता रोबोट

साईनाथ सोनटक्के
Tuesday, 22 September 2020

चंद्रपूर शहर कोरोनासाठी हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी चार दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा सर्वपक्षीय बैठकीत सात दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चंद्रपूर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कोरोनाने महानगरांबरोबरच आता तर शहरांनाही विळखा घालणे सुरू केले आहे. शिवाय हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोना बाधित रुग्णाला विलगीकरणात ठेवले जाते. आजारपणात खरे तर कुटुंबियांची त्यांच्या मायेची अधिक आवश्यकता असते. नेमके त्याचवेळी रुग्णांना एकटेपण वाट्याला येते. यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात आता दोन रोबोट कोरोना रुग्णांची सेवा करणार आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. २५ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबर या कालावधीत त्याची अंमलबजावणी होणार आहे. सोमवारी (ता. २१) नियोजन भवनात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात कोरोनाची समूह संसर्गाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे दिवसागणिक दोनशेहून अधिक रुग्ण नव्याने आढळत आहेत. त्यातच चंद्रपूर शहर कोरोनासाठी हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी चार दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा सर्वपक्षीय बैठकीत सात दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

रुग्णांच्या सेवेसाठी दोन रोबोट दाखल होणार
कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्‍टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात दोन रोबोट रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सरकारकडे दोन रोबोटची मागणी करण्यात आली असून, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यातील दुवा म्हणून हा रोबोट काम करणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. विशेष म्हणजे, हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्‌याने होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यातच आता रोबोट कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे. रुग्णांपर्यंत जाऊन तेथील परिस्थिती, औषधोपचार, रुग्णांची शेवटची इच्छा अशी सर्व माहिती नातेवाईकांना देणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now robot for corona patients in Chandrapur