आता गडचिरोलीतील शाळा इमारतींना येणार चकाकी...जिल्हा परिषदेने कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शासकीय माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम आणि विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी मिळाला.

गडचिरोली : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या कित्येक प्राथमिक शाळांची दुरवस्था झाली आहे. कुठे संरक्षण भिंत नाही, तर कुठे इमारतीची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची दखल जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आली. विविध बांधकामांसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रयत्न केले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनेक कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार शिक्षण व क्रीडा समितीच्या सभेत ठराव घेण्यात आले. गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक कामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शासकीय माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम आणि विशेष दुरुस्तीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी मिळाला.

3 कोटी 89 लाखांचा नियतव्यय मंजूर

त्यातून चामोर्शी, धानोरा, मोहली आणि बेळगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये 8 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, 28 वर्गखोल्यांची दुरुस्ती, 7 शौचालयांची दुरुस्ती, 4 नवीन शौचालयांचे बांधकाम, 4 हॅण्डवॉश स्टेशन आणि एका ठिकाणी किचन शेडचे बांधकाम केले जाणार आहे. नागरी क्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी 3 कोटी 89 लाखांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 2 कोटी 51 लाखांचा निधी प्राप्त झाला.

असं घडलंच कसं : शिल्पग्राम प्रशिक्षण केंद्र दोन वर्षापासून कुलूपबंद! वाचा काय आहे कारण

31 शाळांमध्ये विविध कामांचे नियोजन

शिक्षण व क्रीडा समितीच्या ठरावानुसार जिल्ह्यातील 31 शाळांमध्ये विविध कामांचे नियोजन करण्यात आले. त्यात समूह निवासी शाळा एटापल्ली, जिल्हा परिषद शाळा एटापल्ली टोला, लिंगोटोला, वासामुंडी, क्रिष्णार, मरपल्ली, बारसवाडा, मुलचेरा, चामार्शी नूतन, केंद्र शाळा चामोर्शी, सावरहेटी, दहेगाव, हेमलकसा, कोयनगुडा, बेजूर, हिनभट्टी, मेडपल्ली, दुब्बागुडा, ताडगाव, धर्मपूर, अहेरी, चेरपल्ली, बामणी, गडअहेरी, धानोरा, कोरची, केंद्र शाळा आरमोरी, रामाळा, मुलींची शाळा कोत्तागुडम, उर्दू शाळा कोत्तागुडम, सूर्यरावपल्ली आदी शाळांचा समावेश आहे. त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, 63 वर्गखोल्यांची दुरुस्ती, 14 शौचालयांची दुरुस्ती, 25 नवीन शौचालयांचे बांधकाम, 30 हॅण्डवॉश स्टेशन आणि 9 किचन शेडचे बांधकाम केले जाणार आहे.

शिक्षक-पालकांत संभ्रम

31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढल्याने ऑगस्टपासून, तरी शाळा सुरू होणार की, नाही याबाबत पालक व शिक्षकांत संभ्रमाची स्थिती आहे. ग्रामीण भागांत बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप केले आहे. कित्येक शाळांमध्ये बाहेरून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करून ठेवण्यात आले. त्यामुळे संबंधित शाळांचे निर्जंतुकीकरणाचे काम करावे लागणार आहे. एकूणच कोरोनाच्या संकटामुळे यंदा शैक्षणिक सत्र लांबणीवर पडण्याचे चिन्ह दिसून येत असल्याने पालकही चिंतेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the school buildings in Gadchiroli will get glitter ... Zilla Parishad