आता थेट संवादातून विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक धडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

गडचिरोली : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणाची टक्केवारी वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. पुणे येथील तज्ज्ञ व्यक्तीकडून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी राज्यातील 36 शाळांची निवड करण्यात आली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सात शाळांचा समावेश आहे.

गडचिरोली : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या गुणाची टक्केवारी वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. पुणे येथील तज्ज्ञ व्यक्तीकडून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी राज्यातील 36 शाळांची निवड करण्यात आली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील सात शाळांचा समावेश आहे.
शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. शिक्षकांना वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षण, नावीन्यपूर्ण शालेय उपक्रम, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा तसेच आदिवासी विकास विभागाकडून शासकीय आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथे विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जात आहे. मात्र, आता शासनाने राज्यातील 36 चांगल्या निवडक शाळांमध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स सेवा सुरू केली आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ सोमवारी (ता. 12) शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक अडचणी, गुणवत्ता, उपलब्ध शैक्षणिक सोयीसुविधा तसेच शाळेतील शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. जिल्ह्यातील धानोरा तालुक्‍यातील धानोरा येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, रांगी येथील शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा, चामोर्शी, जारावंडी, भामरागड, सिरोंचा, कुरूड अशा सात शाळांची निवड करण्यात आली. सेटलाइटद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी एका खासगी कंपनीकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवड झालेल्या शाळांना पुरवठा करण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीची गेल्या काही दिवसांपासून चाचपणी सुरू होती. त्यानंतर सोमवारी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाला (virtul classroom) असे नाव देण्यात आले आहे. नववीसाठी आठवड्यातून दोन तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट पुण्यातून संवाद साधला जाणार आहे. या शैक्षणिक उपक्रमासाठी वेळापत्रकसुद्धा तयार करण्यात आले आहे. सोमवार ते गुरुवार, असे पाच दिवस गणित, इंग्रजी व विज्ञान या तीन विषयांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
आश्रमशाळांचाही सहभाग
शैक्षणिक गुणवत्तेत आता आश्रमशाळाही पुढे सरसावल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. शिक्षकांची रिक्त पदे, विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा, त्यांच्या समस्या, इमारती यावर विशेष भर दिला जात आहे.
बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नामवंत शाळेत अकरावीत प्रवेश उपलब्ध करून त्यांना आवश्‍यक ते शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. आता शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स उपक्रमात काही आश्रमशाळांचाही समावेश केल्याने आश्रमशाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मोठी मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now students will get lessons from direct communication