अनुकंपा पदांसाठी आता पारंपरिक पद्धत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नंदोरी (जि. वर्धा) : राज्यातील खासगी शिक्षण संस्थांमधील अनुकंपातत्त्वावरील जागा भरण्यासाठी यापुढे पवित्र पोर्टलद्वारे भरतीची प्रक्रिया करण्यात येणार नाही. त्यासाठी जुनीच पारंपरिक प्रक्रिया निर्धारित करण्यात आली असल्याचे आदेश राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया मागील काही वर्षांपासून रखडलेली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे करण्याचे यापूर्वीच आदेशित करण्यात आले होते. खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शिक्षण संस्थांनादेखील त्यांच्याकडील रिक्त पदे भरताना पवित्र पोर्टलच्याद्वारे नोंदणी करून शासन त्या जागा भरण्यासाठी उमेदवार निश्‍चित करून देणार आहे. या स्वरूपाचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. अनुकंपातत्त्वावरील भरतीदेखील पवित्र पोर्टलद्वारे करण्याची सक्ती करण्यात आली होती; मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
यासंदर्भातील नव्याने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आदेश दिले आहेत. अनुकंपातत्त्वावरील भरती करताना यापूर्वी शिक्षणाधिकारी स्थानिक पातळीवर जी प्रक्रिया करीत होते, त्या स्वरूपाची प्रक्रिया त्यांच्यास्तरावर करून भरतीप्रक्रिया करावयाची असल्याचे कळविण्यात आल्याने अनुकंपाधारकांना दिलासा मिळाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the traditional method for compassionate post