आता जेथे कापूस तेथेच सूतगिरणी

File photo
File photo

आता जेथे कापूस तेथेच सूतगिरणी
नागपूर : आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी असे आजवरचे सरकारी धोरण बदलवण्यात आले असून राज्य सरकारने आता ज्या भागात कापूस पिकतो त्याच भागात सूतगिरणी सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र, यापूर्वीच्या घोषणांप्रमाणे ही घोषणा विरली नाही तरच कापूस उत्पादक विदर्भाला फायदा होण्याची शक्‍यता आहे.
कापूस उत्पादक विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पिकाला पाणी नाही आणि उत्पादन झाले तर भाव नाही अशा दुष्टचक्रात येथील शेतकरी सापडला आहे. राज्य शासनाने कर्जमाफीपेक्षा दीर्घकालीन उपाययोजनांवर भर आहे. मात्र, चार वर्षांत घोषणांशिवाय वैदर्भीय शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही पडलेले नाही. विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होत असताना सूतगिरण्या पश्‍चिम विदर्भात फोफावल्या. ऊस कारखानदारांनी जोडधंदा म्हणून गिरण्या काढल्या. गिरण्यांसाठी वस्रोद्योग महामंडळातर्फे कोट्यवधींचे अनुदान दिले जाते. हेच अनुदान गिळंकृत करण्यासाठी गिरण्या काढल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
आतापर्यंत "टेक्‍सटाइल्स क्‍लस्टर'ची अनेकदा घोषणा झाल्या. बुटीबोरी औद्योगिक परिसराला ही घोषणा नवीन नाही. यात आता थोडा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने कापूस ते कापड ही संकल्पना आखली आहे. याअंतर्गत कापूस उत्पादक क्षेत्रातच सूतगिरण्यांना शासकीय मदत देण्यात येणार आहे. राज्यात 18 जिल्ह्यांतील 118 तालुक्‍यांचा या धोरणात समावेश करण्यात आला आहे. गिरण्यांमुळे कापसाला चांगला भाव मिळेल तसेच रोजगारही निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. विदर्भात सध्या 18 सूतगिरण्या सुरू असून पाच गिरण्या प्रस्तावित आहेत.
9800 टन उत्पादन हवे
शासनाच्या धोरणानुसार सूतगिरणीसाठी वर्षाला 28 हजार 800 गाठी म्हणजे 4 हजार 896 टन कापूस लागतो. ज्या तालुक्‍यात 9 हजार 800 टन कापसाची निर्मिती होते, अशाच तालुक्‍यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
30 टक्के अनुदान देणार
सूतगिरणी उभारण्यासाठी संस्थांना 10 टक्के भाग भांडवल उभारायचे असून 30 टक्के शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे. तर 60 टक्के रक्कम कर्जाऊ मिळेल.
या जिल्ह्याचा समावेश
बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड,परभणी, हिंगोली.
विदर्भातील 56 तालुके
या धोरणात विदर्भातील 56 तालुक्‍यांचा समावेश आहे. यात नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, हिंगणा, पारशिवणी, नरखेड, कळमेश्‍वर, उमरेड आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी, कारंजा, आष्टी, वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना तालुक्‍यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, दारव्हा, आर्णी, पुसद, उमरखेड, मोहगाव, वणी, मारेगाव, झरी, जामनी, केळापूर, घाटंजी, राळेगाव. अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामणगाव, तिवसा, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर. तर बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा तालुक्‍यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com