इंटरनेटचा खोडाः विद्यार्थ्यांचे भवितव्य 'आउट ऑफ कव्हरेज' 

file photo
file photo

नेर, (यवतमाळ) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात "लॉकडाउन' सुरू आहे. पुढेही वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शासनाने सर्व सार्वजनिक ठिकाणे 'लॉकडाउन' केली आहेत. शाळा, महाविद्यालयांसह खासगी शिकवणी वर्गसुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणी वर्गांनी ऑनलाइन कोचिंग सुरू केले आहे. परंतु, या ऑनलाइन शिकवणी वर्गाला इंटरनेटने खोडा घातला आहे. स्पीड नाही, चित्र व्यवस्थित दिसत नाही, स्पष्ट आवाज येत नाही, आदी समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्यच आउट ऑफ कव्हरेच झाल्याचे दिसून येत आहे. 

ऑनलाइन कोचिंग 

राज्यभरातील अनेक शाळा, महाविद्यालये व खासगी कोचिंग क्‍लासेस आदींनी ऑनलाइन कोचिंग सुरू केले आहेत. यामध्ये लिंकद्वारे किंवा व्हिडिओ पाठवून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. वर्गात शिक्षकांनी समोरासमोर शिकविणे परिणामकारक असते. विद्यार्थ्यांना समजले नाही तर तो समजून घेऊ शकतो. शंका दूर करून घेऊ शकतो. डोळ्यांचाही संवाद होत असल्याने ही पद्धती परिणामकारक असते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आता जीवनच बदलले आहे. हा बदल विद्यार्थ्यांनाही स्वीकारावा लागत आहे. परंतु, तो विद्यार्थ्यांसाठी किती परिणामकारक राहील, हे सांगता येत नाही. या पद्धतीत विद्यार्थी एकाग्र होऊ शकत नाही. घरी शिकवणी वर्गातील वातावरण नसते. विद्यार्थी कुटुंबासोबत असतो. त्यामुळे एकाग्र होणे अशक्‍य असते. 

इंटरनेटच्या स्पीडचा खोडा 

कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब व अँड्रॉइड मोबाईलवर हे ऑनलाइन शिकवणीचे धडे दिल्या जात आहेत. परंतु, शहरी तसेच ग्रामीण भागातही इंटरनेटच्या स्पीडची वानवा असल्याने व्हिडिओ डाऊनलोड होत नाही. तो वारंवार अटकतो. अनेक वेळा इंटरनेटची स्पीड केबीएसमध्ये राहत असल्यामुळे केवळ सर्फिंग होते. कमी स्पीडच्या इंटरनेटमुळे आवाजही स्पष्ट येत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षक काय सांगताहेत याचे नेमके आकलन होत नाही. लाखो रुपये खर्च करून पालकांनी आपल्या मुलांना डॉक्‍टर, इंजिनिअर बनविण्याचे स्वप्न बघितले आहे. परंतु कोरोनामुळे नवीनच संकट निर्माण झाले आहे. त्यावर तोडगा म्हणून ऑनलाइन कोचिंगची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यातही इंटरनेट व खंडित वीजपुरवठा यामुळे यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. 

"नॉट रिचेबल, बंद आहे' 

वेगवेगळ्या कंपन्या आपले इंटरनेट व प्लॅन चांगले आहे, असे सांगून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात. एकदा ग्राहकांची संख्या वाढली की सुमार सेवेला सुरुवात होते. नॉट रिचेबल, बंद आहे, उपलब्ध नाही आदी सांगून ग्राहकांना वैतागून सोडतात. सुरुवातीला इंटरनेटला चांगला स्पीड दिला जातो पण नंतर टू जी चा स्पीड दिल्याने नेट ही व्यवस्थित काम करत नाही. अलीकडे विद्यार्थ्यांचे भविष्य इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून आहे. कंपन्यांच्या सुमार सेवेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्यच आउट ऑफ कव्हरेज होण्याची वेळ आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com