वाघांची संख्या तर वाढली, पण व्यवस्थापनाचे काय?

मिलिंद उमरे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

गडचिरोली : जंगलांची शान असलेल्या वाघांची संख्या यंदा तब्बल 2 हजार 967 पर्यंत पोहोचली आहे. तर, महाराष्ट्रात 312 वाघांची नोंद झाली आहे. हा आकडा सरकारसह निसर्ग व व्याघ्रप्रेमींसाठी आनंदाचा असला, तरी वाढलेल्या वाघांचे व्यवस्थापन कसे करणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकीकडे जंगले आक्रसत असताना वाढणारी वाघांची संख्या मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या अधिक गंभीर करत आहे. ही समस्या उग्ररूप धारण करण्यापूर्वीच उपाययोजना करण्यासाठी दूरगामी नियोजनाची गरज असल्याचे अनेक निसर्ग अभ्यासकांचे मत आहे.

गडचिरोली : जंगलांची शान असलेल्या वाघांची संख्या यंदा तब्बल 2 हजार 967 पर्यंत पोहोचली आहे. तर, महाराष्ट्रात 312 वाघांची नोंद झाली आहे. हा आकडा सरकारसह निसर्ग व व्याघ्रप्रेमींसाठी आनंदाचा असला, तरी वाढलेल्या वाघांचे व्यवस्थापन कसे करणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकीकडे जंगले आक्रसत असताना वाढणारी वाघांची संख्या मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या अधिक गंभीर करत आहे. ही समस्या उग्ररूप धारण करण्यापूर्वीच उपाययोजना करण्यासाठी दूरगामी नियोजनाची गरज असल्याचे अनेक निसर्ग अभ्यासकांचे मत आहे.
देशात 2006 मध्ये वाघांची संख्या 1 हजार 411 होती. ती आता 2018 मध्ये वाढून 2 हजार 967 झाली आहे. महाराष्ट्रातही 312 वाघांची नोंद झाली आहे. यातील 280 वाघ एकट्या विदर्भात आहेत. ही संख्या आनंद घेऊन आली, तशीच धोक्‍याचा इशाराही घेऊन आली आहे. हा धोका वाघांपासून मानवांना आणि मानवांपासून वाघांना असा दुहेरी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षभरात घडलेल्या घटनांवर नजर टाकल्यास यातील गंभीरता सहज लक्षात येते. वाघांकडून माणसे मारली जात असताना, चिमूर व इतर काही ठिकाणी माणसांकडून वाघ मारले जाण्याच्या घटनाही घडल्या. वाघाकडून एखादा हल्ला झाला, तर त्याला नरभक्षक ठरवून ठार करण्याचे प्रकारही घडले आहेत. यवतमाळच्या "अवनी' वाघिणीने आपण आजही ही समस्या सोडविण्यात किती कच्चे आहोत, याचा धडाच शिकवला आहे. एखाद्या ठिकाणी वाघ, बिबट्याचा हल्ला झाला, तर त्याला तिथून तत्काळ पकडून इतरत्र हलविणे आवश्‍यक असते. पण, याच कामात खूप वेळ लागतो आणि अधिक घटना घडून नागरिकांचा रोष शिगेला पोहोचतो. त्यासाठी वन्यजीवांना बेशुद्ध करणारे बंदूक हाताळू शकणारे व औषधाची मात्रा अचूक देऊ शकणारे तज्ज्ञ वाढविण्याची गरज आहे.

जिप्सी वाघांचे काय?
जिप्सी वाघ अर्थात भटक्‍या वाघांची समस्या गंभीर रूप घेत आहे. सरकारकडून जी व्याघ्रगणना झाली, ती व्याघ्रप्रकल्प, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, संरक्षित क्षेत्रे अर्थात संरक्षित वनांतील वाघांची आहेत. त्याबाहेरील जंगलांतही अनेक वाघ आहेत. वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांचा जन्मदर प्रचंड आहे. या भटक्‍या वाघांना ज्या संकटातून जावे लागते, ती संकटे कशी कमी करायची, हेच मोठे आव्हान आहे. व्याघ्रप्रकल्प एकमेकांशी जोडताना जंगलांची सलगता ठेवण्याचा प्रस्ताव वजा अहवाल डेहरादून येथील वन्यजीव संस्थेने 2016 मध्ये केंद्र सरकारकडे पाठविला होता. पण, पुढे काही घडल्याचे दिसले नाही.

संख्या वाढ की कॅमेरांची कमाल?
अलीकडे व्याघ्रगणना कॅमेरा ट्रॅपने होऊ लागली आहे. 2014 मध्ये 9 हजार 777 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. तेव्हा महाराष्ट्रात 190 वाघांची नोंद झाली होती. आता 26 हजार 838 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. त्यातून महाराष्ट्रात 312 वाघांची नोंद झाली. याचा अर्थ कॅमेरांची संख्या वाढल्याने अधिक वाघांना कॅमेरात पकडणे शक्‍य झाले.

वाघांचे भ्रमणमार्ग हा सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. विकासकामे आवश्‍यक असली, तरी वाघांचे व इतर वन्यजीवांचे भ्रमणमार्ग जपणेही आवश्‍यक आहे. तसेच संरक्षित वनाबाहेरच्या वाघांचीही काळजी घ्यावी लागेल.
-बंडू धोतरे, अध्यक्ष, इको-प्रो संस्था, चंद्रपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of tigers has increased, but what about management?