१२ वर्षे लांबला पदनिर्मितीचा पाळणा!

Nurse
Nurse

नागपूर - राज्यातील चार बीएससी परिचर्या महाविद्यालयात २००६ सालापासून प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी आणि सहायक प्राध्यापक पदांची प्रतीक्षा आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे १२ वर्षांपासून बीएससी परिचर्या महाविद्यालयातील पदनिर्मितीचा पाळणा लांबला आहे. मात्र यावर्षी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वर्षभरासाठी मान्यता देण्यात येणार नसल्याचा इशारा देत ३ महिन्यांत पदे भरण्यात आली नाहीत तर चारही परिचर्या महाविद्यालयांची परवानगी रद्द केली जाईल, असा दणका पत्रातून दिला आहे, यामुळे परिचर्या महाविद्यालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.  

विशेष असे की, सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात राज्यातील ४ बीएससी परिचर्या महाविद्यालयांतील ३२ पदांना मान्यता देण्याचे निर्देश दिले; परंतु वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे वैद्यकीय सचिव आणि वैद्यकीय संचालक यांच्याकडून उच्च न्यायालयात दरवर्षी शपथपत्र सादर करून आरोग्य विद्यापीठाकडून वर्षभरासाठी मान्यता मिळवून घेत होते.

आरोग्य विद्यापीठही याला बळी पडत होते. तब्बल १२ वर्षे आरोग्य विद्यापीठाला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांसहित संचालकांनी खेळवत ठेवले आणि दरवर्षी पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपुरातील बीएससी नर्सिंग कॉलेजला ट्यूटरच्या भरवशावर सुरू ठेवण्यास मान्यता देत गेले. ३१ ऑक्‍टोबरला मात्र आरोग्य विद्यापीठाने राज्यातील चारही महाविद्यालयांतील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच सहायक प्राध्यापक पदे न भरल्यास मान्यता रद्द करण्यात येईल, असे थेट बोल पत्रातून सुनावले आहेत.

हिवाळी अधिवेशनात सुटावा प्रश्‍न...
पदनिर्मितीअभावी बीएससी नर्सिंगची मान्यता धोक्‍यात आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग अकलेचे तारे तोडत होता. सेवाज्येष्ठतेनुसार प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशी तात्पुरते पद निर्माण करीत प्रभारावर काम सुरू ठेवल्याचे दाखवून वर्षभराची मान्यता मिळवत असे. आज नाही तर उद्या पद मिळेल या आशेवर राज्यातील आशा शिमगेकर, श्रीमती देवधर,  रेझिना डायस, अनिता परदेसी, स्वाती कांबळी, श्रीमती मिस्त्री, प्रीती वैद्य, श्रीमती आकुट, अडसूळ, संजय पाटील असे डझनभर प्रामाणिक ट्यूटर इमानेइतबारे काम करून अखेर निवृत्त झाले. किमान या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न सुटावा अशी आशा करीत १२ वर्षे प्रकरण रेंगाळत ठेवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रॅज्युएट ट्रेन्ड नर्सेस असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

 नागपूर           - १२ पदे 
 पुणे             -  ५ पदे
 औरंगाबाद      -   ५ पदे
 मुंबई           -   ५ पदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com