नर्सरीत प्रवेश @  वीस हजार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मराठी माध्यमाचे प्रवेश सुरू 
शहरातील काही ठराविक मराठी माध्यमाच्या नर्सरीत विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत प्रवेश दिला जात आहे. या शाळांमध्ये साधारणतः ज्यांच्या पाल्यांना इतर ठिकाणी प्रवेश मिळाला नाही ते येथे प्रवेशासाठी जात आहेत. यात पालकांचा पाल्यांना मराठी माध्यमात शिक्षण देण्याचा कल कमी असल्याचे चित्र आहे.

अकोला : शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना नर्सरी, बालवाडीत प्रवेश हवा असल्यास सुरवातीला किमान वीस ते तीस हजार रुपये मोजावे लागत आहेत. यातील निम्मी रक्कम ‘डोनेशन’ म्हणून काही शाळा उघडपणे घेत आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्‍याच्या ठिकाणीच नव्हे; तर अगदी ग्रामीण भागातही या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा सर्वसामान्यांना शिक्षणाच्या नावाखाली लुटताना दिसत आहेत. दरम्यान, एवढी रक्कम मोजूनही काही शाळांत अजूनही प्रवेशासाठी पालकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. 

शहरातील निम्म्या शाळांत इंग्रजी माध्यमातील नर्सरी, बालवाडीची प्रवेशप्रक्रिया ‘फुल्ल’ झाली आहे. मात्र, मराठी माध्यमातील नर्सरीचे प्रवेश अजूनही सुरू आहेत. जूनच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. शहरातील विविध नामांकित शाळांत इंग्रजी व मराठी माध्यमातील नर्सरी प्रवेशाला मार्चमध्येच सुरवात झाली होती. नामांकित शाळांत पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांनी धावपळ करीत संबंधित संस्थाचालकांशी संपर्क साधला. 

पालकांचीही मुलाखत 
नर्सरीत प्रवेश घेताना ‘डोनेशन’ दहापासून वीस हजार रुपयांपर्यंत आहे. वार्षिक शुल्क दोन ते साडेपाच हजार रुपये शाळेचा दर्जा पाहून आकारला जात आहे. प्रवेश देताना पाल्याचा जन्मतारखेचा दाखला, आई-वडिलांचे छायाचित्र आणण्यास सांगितले जात असून, प्रवेश देतेवेळी पाल्याचे निरीक्षण करून त्याचा व आई-वडिलांची मुलाखत घेण्यात येत आहे. 

ठराविक दुकानातून शालेय साहित्याची सक्ती 
अनेक शाळांनी नर्सरीत प्रवेश दिल्यावर अमुक दुकानातूनच पाल्याचा गणवेश घ्यावा. तसेच अमुक दुकानातूनच शालेय साहित्य घ्यावे, अशी सक्ती केली जात आहे. त्यामुळे पालकांना ‘डोनेशन’, वार्षिक शुल्क खर्चासह ठराविक दुकानदाराने ठरवून दिलेल्या दराचेच साहित्य, गणवेश घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

मराठी माध्यमाचे प्रवेश सुरू 
शहरातील काही ठराविक मराठी माध्यमाच्या नर्सरीत विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत प्रवेश दिला जात आहे. या शाळांमध्ये साधारणतः ज्यांच्या पाल्यांना इतर ठिकाणी प्रवेश मिळाला नाही ते येथे प्रवेशासाठी जात आहेत. यात पालकांचा पाल्यांना मराठी माध्यमात शिक्षण देण्याचा कल कमी असल्याचे चित्र आहे.

Web Title: nursery admission in Akola