आरोग्याचा दिवा लावणाऱ्या परिचारिकांचे आयुष्य अंधारात

केवल जीवनतारे
शुक्रवार, 12 मे 2017

आदिवासी पाडे, पारध्यांच्या तांड्यानजीक आरोग्य केंद्रातही आरोग्यसेविका सेवा देतात. मात्र, गेल्या दशकापासून त्यांच्या मानधनात एक रुपया वाढला नसल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली

नागपूर -  घुग्गुस तालुक्‍यातील दुर्गम भागातील घटना. डॉ. आंबेडकर रिसर्च व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी "समतादूत' उपक्रमासाठी गेले होते. अचानक त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली. रुग्णालय तीस किलोमीटर दूर. जवळ प्राथमिक आरोग्य केंद्र होते. डॉक्‍टरही नव्हते. खास प्रशिक्षण नसलेली परिचारिका अन्‌ आरोग्यसेविका उपस्थित होत्या. अल्पशिक्षित होत्या, आरोग्याचं ज्ञान आहे की नाही, ही भावना अधिकाऱ्याच्या मनात घुसली होती. यामुळे ते अधिकच अस्वस्थ झाले होते; मात्र आरोग्यसेविकेने एक इंजेक्‍शन दिलं... आणि काही मिनिटांतच अधिकाऱ्याची प्रकृती स्थिरावली. परिचारिका आणि आरोग्यसेविकेला धन्यवाद देऊन हा अधिकारी निघून गेला... एका अधिकाऱ्याला जीवनदान दिल्याचं समाधान या परिचारिकांच्या चेहऱ्यावर झळकत होतं. मात्र दुसऱ्याच्या आयुष्यात आरोग्याचा दिवा लावणाऱ्या या परिचारिकांच्या आयुष्यात अंधार दाटला आहे. करार पद्धतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनातून आपल्या कुटुंबाचा गाडा त्याचा लवत आहेत.

दिवाळी असो की दसरा, होळी असो की महिला दिन. या परिचारिका रुग्णालयातच कर्तव्यावर दिसतात. सेवाभावी वृत्तीतून रुग्णांच्या जीवनात "देवदूता'सारखे त्यांचे काम. राज्यात 8 हजारांवर आरोग्यसेविका आणि परिचारिका करार पद्धतीवर (कंत्राटी) तुटपुंज्या वेतनात सेवा देत आहेत. माता व बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी बारा वर्षांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत त्या आपली मेहनत विकत आहेत. परंतु त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी सरकारी दरबारी अनास्था आहे. राज्यात साडेसहा हजार आरोग्यसेविकांसह (एएनएम) बाराशेवर परिचारिका (जनरल नर्सिंग-जीएनएम) आठ तासांऐवजी 12 तास प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयांत सेवा देताहेत. मात्र त्यांच्या सेवेचे मोल 6 ते 8 हजार मासिक मानधन दिले जाते. आदिवासी पाडे, पारध्यांच्या तांड्यानजीक आरोग्य केंद्रातही आरोग्यसेविका सेवा देतात. मात्र, गेल्या दशकापासून त्यांच्या मानधनात एक रुपया वाढला नसल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली.

स्थायी होण्यापासूनही वंचित
आरोग्यसेविका आणि परिचारिचारिकांचे दशकापासून ना मानधन वाढले, ना त्या स्थायी झाल्या. करार पद्धतीवरील परिचारिकांच्या हिताचे कोणतेही धोरण राज्य शासनाने तयारच केले नाही. सेवाभावी व्यवसायात करार पद्धती आणल्यामुळे परिचारिका व्यवसायाची प्रकृती खालावली आहे. एखाद्या अस्वस्थ माणसाला जीवनदान देण्याचे पुण्यकर्म त्या करतात, परंतु आर्थिकदृष्ट्या या साऱ्या परिचारिका अशक्त असूनही सेवेचा धर्म निभावत आहेत.

Web Title: Nurses face a difficult life