नर्सिंग स्कूलच्या वाढीव जागा रिक्‍त

नर्सिंग स्कूलच्या वाढीव जागा रिक्‍त

नागपूर - राज्यात खासगी नर्सिंग स्कूलचे पेव फुटले आहे. खासगीला प्रशिक्षणार्थी मिळत नसल्याने मेयोशी संलग्न असलेल्या जनरल नर्सिंग स्कूलच्या जागा कमी केल्या होत्या. मात्र, स्वयंसेवी संघटनांच्या आंदोलनामुळे जागा पूर्ववत केल्या. परंतु, वाढीव जागांवर प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. ४० पैकी २७ जागांवर प्रवेश दिले जात असल्याचे षड्‌यंत्र वैद्यकीय संचालक कार्यालयातून राबवण्यात येत असल्याची जोरदार चर्चा मेयोत रंगली आहे.

राज्यात १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये जनरल नर्सिंग स्कूल सुरू आहेत. इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या मान्यतेनुसार इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ४० जागा होत्या. ट्यूटरची कमतरता असल्याने २७ जागा करण्यात आल्या. मात्र, ट्यूटरच्या संख्येनुसार पुन्हा ४० जागांना प्रवेश घेता येईल, अशा सूचना इंडियन नर्सिंग कौन्सिलने दिल्या. 

परंतु, वैद्यकीय संचालक कार्यालयाने प्रवेश प्रक्रिया राबवताना २७ जागांवर प्रवेश थांबले. प्रवेशाचा घोळ करण्यामागेही खासगी नर्सिंग स्कूलचे कारण असल्याचे दिसून येते. शासकीय नर्सिंगमध्ये प्रवेश न घेतल्याने खासगी नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. अशी खेळी खेळणारे शुक्राचार्य वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत असल्याची चर्चा आहे.

प्रवेश प्रक्रियेला उशीर
मागील वर्षी जनरल नर्सिंग स्कूलच्या प्रवेश प्रक्रियेला ऑक्‍टोबरपासून सुरुवात करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाने दिल्या होत्या. प्रत्यक्षात बारावीच्या निकालानंतर ‘जून’मध्ये दरवर्षी नर्सिंग स्कूलचे सत्र सुरू होते. परंतु, ऑक्‍टोबरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू निर्देश दिल्याची माहिती नर्सिंग ट्यूटरकडून मिळाली. राज्यात ४५० पेक्षा अधिक खासगी जनरल नर्सिंग स्कूल आहेत. खासगीत नर्सिंग स्कूलचे प्रवेश सुरू झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. सरकारच्या प्रवेश प्रक्रिया उशिरा राबवल्यास खासगीचे पोषण होते, अशी चर्चा मेयोच्या वर्तुळात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com