एनव्हीसीसीच्या निवडणुकीचे पडघम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः विदर्भातील व्यापाऱ्यांची मुख्य संघटना नागविदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सच्या (एनव्हीसीसीत) वार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मंगळवारी (ता. 10) होणाऱ्या आमसभेत कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्याच्या दृष्टीने हालचालीला वेग आला आहे. त्यासाठी सहा सदस्यांची कोअर कमिटी तयार केली आहे. विद्यमान उपाध्यक्षातूनच एकाची अध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब झालेले आहे. तरीही आमसभेला अद्याप दोन दिवस शिल्लक असल्याने त्यात फेरबदलाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
विद्यमान अध्यक्ष हेमंत गांधी आणि सचिव संजय अग्रवाल यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. गांधी यांनी प्रकृतीच्या कारणामुळेही माघार घेतलेली आहे. यामुळे तीन उपाध्यक्षांमधूनच एकाची अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने सुकाणू समितीच्या बैठकी सुरू आहेत. सुकाणू समितीमध्ये माजी अध्यक्ष बी. सी. भरतीया, प्रकाश वाधवानी, दीपेन अग्रवाल, प्रकाश मेहाडीया, विद्यमान अध्यक्ष हेमंत गांधी आणि उपाध्यक्ष अश्‍विन मेहाडीया यांचा समावेश केला आहे. या समितीत एका उपाध्यक्षांचा समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. "तेच' नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे असल्याचेही बोलले जात आहे. समितीतील काही माजी अध्यक्षांनी आपल्या पसंतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी जोर लावला असल्याची चर्चा आहे. असे असताना कोअर कमिटीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाऊन उलट फेर होण्याची शक्‍यताही दबक्‍या आवाजात व्यक्त केली जात आहे.
स्वातंत्र्याच्या आधी स्थापन झालेली एनव्हीसीसी ही 1,400 थेट सदस्य व 125 व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेची वार्षिक निवडणूक व्यापारी जगतात चर्चेचा विषय असते. कधी बिनविरोध, कधी चुरशीची निवडणूक आजवर झाली आहे. अनेक संघटनांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने काही जणांचेच वर्चस्व या संस्थेवर असल्याचेही व्यापारीवर्गात बोलले जात आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा व्यापाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अध्यक्ष आणि सचिव सक्रिय हवा तेव्हाच संस्थेचे भविष्य उज्ज्वल असते. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा सोपस्कार करणारे पदाधिकारी आल्यास संस्थेच्या मुख्य उद्देशाची पूर्तता होत नसल्याचेही काही सदस्यांचे म्हणणे आहे.
अध्यक्षासोबतच सचिवपद महत्त्वाचे असल्याने या पदाकडेही अनेकांच्या नजरा लागून आहेत. विद्यमान सचिव अग्रवाल यांचाही कालावधीही पूर्ण झाल्याने नवीन सचिवाची निवड केली जाणार आहे. त्यासाठी हालचाली वाढल्या असून वेळ देईल त्या व्यक्तीला सचिव करावे, असा सूर उमटू लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com