tiger
tiger

बापरे! टेंभूरखेडा, भेंमडी शिवारात फिरतोय वाघ... 

वरुड (जि. अमरावती) : टेंभूरखेडासह भेंमडी शेतशिवारात दोन दिवसांपासून पुन्हा वाघाच्या दर्शनाने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शेतकरी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने या परिसरात गस्त वाढविली असून ड्रोन कॅमेराद्वारे वाघांच्या पावलांचे फोटो आणि अस्तित्व शोधण्यात वनविभागाला यश आले आहे. सद्यस्थितीत सातपुड्याच्या पायथ्याशी, म्हणजे भेंमडी शेतशिवारात वाघाचे अस्तित्व असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. वनविभाग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत लांबाडे यांनी दिली. 

गावकऱ्यांनी प्रत्यक्ष बघितले वाघाला

वरुड तालुक्‍यात वाघ आणि बिबट्याचे अस्तित्व असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. 
गेल्या 2 दिवसांपासून टेंभूरखेडा शेतशिवारामध्ये वाघ असल्याचे वृत्त संपूर्ण तालुक्‍यात पसरले. टेंभूरखेडा येथील काही युवकांनी प्रत्यक्ष वाघाला बघितल्याने त्या वृत्ताला दुजोरासुद्धा मिळाला. टेंभूरखेडा येथील मधू हिवसे, नरेंद्र पंडागळे, पिंटू खंडाळे यांनी या वाघाला प्रत्यक्ष बघितले. शेतकरी व परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत लांबाडे, शेतकरी वर्तुळाचे वनपाल डी. ए. नवले, वनरक्षक मिलिंद गायधने, जंगले, चौधरी व इतर वनकर्मचारी तातडीने या परिसरात दाखल झाले. 

ड्रोन कॅमेऱ्याने घेतला शोध

तपासाअंती या परिसरातील वाघाचे ठसे आढळून आल्याने वनाधिकाऱ्यांनीसुद्धा या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याची कबुली दिली. हा वाघ मध्य प्रदेशातील वनविभागातून महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाला असावा, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत लांबाडे यांनी व्यक्त केला. यानंतर दोन दिवसांपासून वनाधिकारी व कर्मचारी या वाघाच्या शोधात आहेत. सोमवारी (ता. 27) शहरातील कॅमेरामन संजय बेलसरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकदरी, टेंभूरखेडा व भेंमडी परिसरामध्ये ड्रोन कॅमेरा फिरवून वाघाच्या ठशांची माहिती घेतली. ज्या परिसरामधून ड्रोन कॅमेरा फिरविण्यात आला, त्या परिसरामधून वाघ फिरून गेल्याचे निदर्शनास आले. 

वाघाच्या हालचालींवर वनविभागाचे लक्ष

हा वाघ सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या हद्दीत असून त्यावर वनविभाग पूर्णतः लक्ष ठेवून आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी 24 तास या वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे. अशा स्थितीत शेतकरी व नागरिकांनी घाबरून जाऊ नये, केव्हाही वाघासंदर्भात माहिती मिळाली तर तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. दरम्यान वनविभागाच्या वतीने सर्वच प्रकारची काळजी घेतली जात असून वाघ पकडण्यासाठी पिंजऱ्यासह सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. अशा स्थितीत वाघ केव्हाही मध्य प्रदेशाच्या हद्दीत प्रवेश करू शकतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

https://www.esakal.com/vidarbha/conducting-pkashi-mitra-meet-lonar-256050

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com