आक्षेप व्हीव्हीपॅटवर, तपासणी ईव्हीएमची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मत एकाला दिले आणि व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच उमेदवाराला गेल्याचे दिसले तर काय करायचे, असा प्रश्‍न विचारल्यास व्हीव्हीपॅटची तपासणी करा आणि खरे-खोटे उघड करा असे सोपे उत्तर कोणीही देईल. मात्र, इतका सरळसोपा प्रश्‍न निवडणूक आयोगाने किचकट करून ठेवला आहे.

नागपूर - मत एकाला दिले आणि व्हीव्हीपॅटवर दुसऱ्याच उमेदवाराला गेल्याचे दिसले तर काय करायचे, असा प्रश्‍न विचारल्यास व्हीव्हीपॅटची तपासणी करा आणि खरे-खोटे उघड करा असे सोपे उत्तर कोणीही देईल. मात्र, इतका सरळसोपा प्रश्‍न निवडणूक आयोगाने किचकट करून ठेवला आहे. व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याऐवजी संपूर्ण ईव्हीएमची पडताळणी केली जाते. त्यामुळे मूळ आक्षेप व शंका कायमच राहते.

मागील निवडणुकीच्या निकालामुळे अनेकांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली होती. उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केल्या. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात असेही दावे करण्यात आले. विरोधात असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमऐवजी जुन्याच पद्धतीने निवडणुका घेण्याची मागणी केली होती. भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांचे विरोधक हीच मागणी करीत  आहेत. त्यामुळे न्यायालयाने ईव्हीएमला व्हीव्हीपॅट लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार तुम्ही कोणाला मत दिले हे सात सेकंदापर्यंत बघू शकता. 

ही समाधानाची बाब असली तरी अद्याप  शंकेचे निरसन झालेले नाही. आक्षेप व्हीव्हीपॅटवर नोंदवल्यास त्याची पडताळणी का केली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तक्रार आल्यास वेळ मारून नेण्याची प्रक्रिया असल्याचे आरोप आता केले जात आहे.

अशी आहे प्रक्रिया
निवडणूक आयोगाच्या नियम १९६ च्या कलम ४९ एम (ए) अंतर्गत केंद्रावरच्या प्रिसायडिंग अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदविता येते. त्यानुसार तक्रारकर्त्यांकडून डिक्‍लेरेशन फॉर्म भरून घेतला जातो. त्यानंतर प्रिसायडिंग अधिकारी व पोलिंग एजंट यांच्या समक्ष पुन्हा मतदान घेतले जाते. त्याला ‘टेस्ट व्होट’ म्हणतात. यात संबंधित मतदाराचा आक्षेप खरा निघाल्यास प्रिसायडिंग अधिकारी, एआरओ, आरोला माहिती दिली जाते. त्यानंतर संबंधित मशीनवरील मतदानाची  प्रक्रिया पूर्णपेण थांबविली जाते. ‘टेस्ट व्होट’मध्ये आक्षेप खोटा निघाल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. यात व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची कुठलीच तरतूद नाही. स्लिपवर आक्षेप असल्याने त्याची पडताळणी होणे अपेक्षित आहे.

Web Title: Objection VVPAT inspection of EVM