आयुक्तांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आयुक्तांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्‍यात  
नागपूर : अग्निशमन विभागाने महापालिका प्रशासनाला तीस दिवसांत अग्निशमन यंत्रणा लावण्याबाबत नोटीस देऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप कुठलीही प्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार महापालिकेची प्रशासकीय इमारत असुरक्षित असून येथे आयुक्तांसह हजारो अधिकारी व कर्मचारी जीव धोक्‍यात घालून काम करीत आहेत. येथे कामानिमित्त येणाऱ्या हजारो नागरिकांचाही जीव यानिमित्त धोक्‍यात आहे.

पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडावे अशी महापालिकेची सात मजली प्रशासकीय इमारत आहे. परंतु, या इमारतीतील आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांचे कक्ष असलेल्या ग्राउंड फ्लोअरवरही फायर आलार्म पॅनल लावण्यात आले नाही. इतर मजले अद्याप अग्निशमन यंत्रणेपासून लांब आहे. या प्रशासकीय इमारतीबाबत अग्निशमन विभागाने अहवाल तयार केला असून उपाययोजनांची पूर्तता करण्यासंदर्भात विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांच्याकडे सुपूर्द करीत अग्निशमन यंत्रणा तीस दिवसांत लावण्याच्या सूचना 9 मे रोजी केल्या होत्या. अग्निशमन यंत्रणा लावण्याबाबत कालावधी 8 जूनलाच संपुष्टात आला. अग्निशमन विभागाच्या अहवालावरून सुरुवातीला प्रत्येक मजल्यावर इस्टिंग्यूशर लावण्यात आले. मात्र, त्यानंतर कुठलीही प्रक्रिया दिसून येत नाही. मात्र, एका अधिकाऱ्याने अग्निशमन यंत्रणा लावण्याचे काम मेसर्स एस. आर. असोसिएट्‌सला दिले असल्याचे नमूद केले. सहाव्या व सातव्या माळ्यावर अग्निशमन यंत्रणा लावण्याचे काम सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने नमूद केले. मात्र, तीस दिवसांत अग्निशमन यंत्रणा लावण्याचे काम पूर्ण न झाल्याने त्यात वाढ करून घेण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नसल्याचे समजते. याप्रकरणी अग्निशमन विभाग महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार महापालिका प्रशासनाला नोटीस देऊन नळ व वीज जोडणी बंद करू शकते. परंतु, अग्निशमन विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
केवळ 706 इमारती सुरक्षित
अग्निशमन विभागाने 3635 इमारतींना बांधकामादरम्यान नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. यातील केवळ 706 इमारतींना अग्निशमन यंत्रणा उभी केली. त्यामुळे अग्निशमन विभागाने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमानुसार 1920 इमारतींना नोटीस पाठविले. यातील 925 इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे आढळून आले असून साडेतीनशे इमारतीतील पाणी तर 50 इमारतीची वीज जोडणी बंद करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: Officers, employees lives are in danger