कोरोना काळातही ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रवाहित केली गंगोत्री! घेताहेत इंग्रजीचे ऑफलाइन वर्ग

मिलिंद उमरे
Thursday, 13 August 2020

गावात वीज व नेटवर्क नसतानासुद्धा हे कार्यकर्ते गावात जाऊन लॅपटॉपच्या मदतीने इंग्रजीचे ऑफलाइन वर्ग घेत आहेत. ज्या गावांच्या शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी परवानगी दिली व बसण्यासाठी जागेची व्यवस्था करून दिली त्या गावांमध्ये मास्कचा वापर, शारीरिक अंतर व हात धुणे आदी गोष्टींची काळजी घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.

गडचिरोली : सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असला, तरी गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा नाही. शिवाय गरीब मुलांची महागडे अँड्रॉइड मोबाईल घेण्याची व रिचार्ज करण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण परवडू न शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी कुरखेडा येथील आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेने मदतीचा हात दिला आहे. या संस्थेने बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट मुंबई व चाइल्ड राइट्‌स अलायंस या संस्थांच्या सहकार्याने ग्रामीण भागांतील मुलांना थेट भेटून इंग्रजीचे ऑफलाइन शिक्षण देणे प्रारंभ केले आहे.

आम्ही आमच्या आरोग्यासाठी, बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट मुंबई व चाइल्ड राइट्‌स अलायंसमार्फत जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या परवानगीने ऑनलाइन इंग्रजी शिक्षणाचा कार्यक्रम एप्रिल २०१९ पासून गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्‍यातील ३० व कुरखेडा तालुक्‍यातील ३० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत मार्च २०२० पर्यंत सुरू होता.

यात ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एलईडी टीव्ही व विजेची व्यवस्था आहे, अशा शाळेची निवड करून प्रत्येक शाळेतील एका शिक्षकांचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेऊन त्यात वर्ग पहिली ते पाचवीचे इंग्रजी विषयाचे ऑनलाइन अभ्यासक्रम पेनड्राईव्हवर देण्यात आले. त्याप्रमाणे त्या-त्या शाळेतील प्रशिक्षित शिक्षक-शिक्षिका यांच्या नियमित शाळेच्या वेळात एलईडी टीव्हीवर हा अभ्यासक्रम घेत होते. मात्र, कोविड-१९ चे संक्रमण सुरू झाल्यानंतर २५ मार्च २०२० पासून देशात लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे सर्व शाळा बंद आहेत. शाळेत शिकणारी मुले-मुली घरी गावातच आहेत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडला आहे.

अशावेळी संस्थेने राजीमसाय गंगाकाचुर यांची कोरची तालुक्‍यासाठी व घनश्‍याम गहाणे यांची कुरखेडा तालुक्‍यासाठी निवड केली. त्यांना गावात जाऊन मुला-मुलींना ऑफलाइन इंग्रजी शिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येकाकडे लॅपटॉप देण्यात आला आहे. त्यात पहिली ते पाचवी या वर्गाचे इंग्रजी विषयाचे अभ्यासक्रम लोड करून देण्यात आले आहेत. गावात वीज व नेटवर्क नसतानासुद्धा हे कार्यकर्ते गावात जाऊन लॅपटॉपच्या मदतीने इंग्रजीचे ऑफलाइन वर्ग घेत आहेत. ज्या गावांच्या शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी परवानगी दिली व बसण्यासाठी जागेची व्यवस्था करून दिली त्या गावांमध्ये मास्कचा वापर, शारीरिक अंतर व हात धुणे आदी गोष्टींची काळजी घेऊन हा उपक्रम राबविला जात आहे.

२०० मुलांना ज्ञानदान
कोरची तालुक्‍यातील सोहलेटोला, जांभळी, साल्हे, पांढरीगोटा, सोनपूर, अल्लीटोला व कुरखेडा तालुक्‍यातील आंधळी, चिचेवाडा, जांभुळखेडा, आंजनटोला, गुरनोली, भटेगाव, कन्हारटोला आदी गावे मिळून २०० हून अधिक मुला-मुलींना या लॉकडाउनच्या काळात इंग्रजीचे शिक्षण घेता येत आहे.

सविस्तर वाचा - काय म्हणता? कोरोना झाला तरी आता गृह विलगीकरण!

कसोशीने प्रयत्न सुरू
मानवीजीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यात खंड पडू नये, यासाठी आमची धडपड सुरू असते. त्यातूनच हा उपक्रम आकाराला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइनच्या व्यवस्थेअभावी शिक्षणात मागे पडू नयेत म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.''
डॉ. सतीश गोगुलवार
संस्थापक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा जि. गडचिरोली

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offline classes for students in villege by social workers