अरे देवा, 60 रुपयांत चालवावा लागतो संसाराचा गाडा 

file photo
file photo

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन 50 टक्के देण्याचा निर्णय घेतला. यातही सर्व रक्कमा कापून देण्याचे आदेश होते. अर्ध्या पगारामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कपातीमुळे काही कर्मचाऱ्यांचा पगार काही हजार झाला असला तर काहींचा पगार तर रुपयांत खात्यात जमा झाल्याने अनेकांसमोर संसाराचा गाडा हाकण्यासाठी ताळमेळ बसविण्यासाठी सर्कस करावी लागणार आहे. 

270 कोटी दिले एमटी महामंडळाला 
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एसटी महामंडळाची सार्वजनिक वाहतूकही बंद आहे. परिणामी, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मे पेड जूनच्या पगारासाठी महिन्याचा शेवट उजाडला. राज्य शासनाने 270 कोटी रुपये एमटी महामंडळाला दिले आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न निकाली निघेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र, कर्मचाऱ्यांची अपेक्षा फार काळ टिकली नाही. शासनाने अनुदान दिल्यानंतर काही दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने 50 टक्के वेतनाचे परिपत्रक काढले. यात सर्व कपाती करण्याच्या सूचनाही होत्या. त्यामुळे अनेक अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला. उर्वरित 50 टक्के वेतन होणार आहे. मात्र, हाती आलेल्या रक्कमा रुपयांत असल्याने कर्मचाऱ्यांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण 
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वेतन कमी आहे. यातही कोरोनाच्या काळात महामंडळातील कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. असे असतानाही हातात आलेल्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 15 ते 17 हजार रुपये पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाती सर्व कपाती करून अडीच ते तीन हजार रुपये आले आहेत. काही कर्मचाऱ्यांना या पद्धतीने वेतन हातात आले आहे. अनेकांना कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमा पाहिल्या तर 60 रुपये, 150 रुपये, पाचशे रुपये अशा पद्धतीचे वेतन झाले आहे. या स्थितीमुळे एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. संघटनांनी या विरोधात पाठपुरावा सुरू केला आहे. असे असले तरी दुसऱ्या टप्प्यातील वेतन हातात येईपर्यंत हाती आलेल्या रक्कमेवरच संसाराचा गाडा चालवावा लागणार आहे. 

जुन्या कर्मचाऱ्यांना मिळाले सहा ते सात हजार 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील जुन्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार 30 ते 37 हजार रुपयापर्यंत जातो. या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या अर्ध्या पगारातून कपात होऊन त्यांच्या हातात सहा ते सात हजार रुपये एवढी रक्कम आली आहे. महामंडळाच्या सेवेत असलेल्या नवीन कर्मचाऱ्यांना तर यापेक्षाही कमी रक्कम हाती आली आहे. 

50 टक्के वेतन देणे हा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. अनेकांच्या हाती फार मोजकी रक्कम आली आहे. यात कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण तसेच इतर अनेक बाबीचा खर्च भागविणे कठीण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शंभर टक्के वेतन देण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. 
-राहुल धार्मिक, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना, यवतमाळ. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com