अरे बापरे...! सेवानिवृत्त अभियंत्याकडे सापडले किलोभर सोने अन् पाव किलो चांदी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

बेहिशेबी ‘माया’ जमविणाऱ्या अभियंत्यास दोन वर्षाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली. एक लाख रुपये दंडासह अपसंपदा जमा करण्याचे आदेशही देण्यात आले.

अकोलाः लाभक्षेत्र विकास प्राधीकरण पाटबंधारे विभाग वर्ग-1 (सोलापूर) च्या सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्यास बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी दोन वर्षाचा कारावास सोबतच एक लाख रुपये दंड आणि जमा केलेली अपसंपदा जमा करण्याचे आदेश देण्यात आले. हा निकाल द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.के. भालेराव यांच्या न्यायालयाने शुक्रवारी (ता.13) दिला.

न्यायालयीन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी वसंत लाडजी ढोके (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सोलापूर) याच्याविरुद्ध देविदास रामसाजी माहुळकर (रा.अमरावती) यांनी भ्रष्टाचार करून बेहीशेबी मालमत्ता जमा केली असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक डी.बी. तडवी यांनी प्राथमिक चौकशी करून अकोला येथील सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांत अ.पं.नं 3141/ 2004 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाच्या चौकशीतून दोषी ढोके याच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या साधनापेक्षा अपसंपदाची रक्कम 22 लाख 18 हजार 483 रुपये इतकी आढळली. दोषी ढोके यांच्याकडे त्यांना नोकरीतून मिळालेले वेतन तसेच स्थावर व जंग मालमत्ता यांचा हिशोब केला असता त्यांच्या अपेक्षीत खर्च व बचतीच्या हिशोबामध्ये अपसंपदा मालमत्ता मिळाली ज्याचे स्पष्टीकरण ढोके विद्यमान न्यायालयाकडे देऊ शकले नाही. त्यामुळे द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम13(1)(ई) 13 (2) अन्वये दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा - महाविकास आघाडीचे सरकार मराठा विरोधी

Image may contain: one or more people

सविस्तर पहा - अबब...वीज चोरीचे अजबगजब फंडे

यांनी पाहले कामकाज, यांनी केला तपास
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. आर.एस. रेलकर व विनोद काटे यांनी बाजू मांडली. तसेच तपास अधिकारी डी.बी तडवी, विनोद इंगोले, डी.जे. बर्डेकर यांनी तपास केला. तसेच न्यायालयीन कामकाकाजामध्ये संतोष उंबरकर यांनी कामकाज पाहले.

No photo description available.

दोषी अभियंत्याकडे एक किलो सोने, पाव किलो चांदी!
दोषी वसंत लाडजी ढोके याच्याकडे अकोला व अमरावती येथील घर व फ्लॅट तसेच बॅंकेत मिळालेले एक किलो सोने व एक पाव चांदी तसेच बॅंकमधील फिक्स डिपॉझीट व इतर मालमत्ता आढळून आली होती. एकूण अभियंत्याचे उत्पन्न आणि जमा केलेली संपत्ती याचा ताळामेळ न बसल्याने दोषी ठरविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh my god, a retired engineer in the irrigation division found a pound of silver