चूल पेटवण्यासाठी आजीबाई करतेय धडपड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात हे चित्र पाहिल्यानंतर करुणा उत्पन्न होईल. मात्र ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची केले. अशा नातलगांकडून हेळसांड झाल्यानंतर वृध्दापकाळ म्हणजे कठीण समय येता कोण कामास येते याची प्रचिती देणारा ठरतो.

शेवगांव : आयुष्याची संध्याकाळ असलेल्या वृध्दापकाळी सुखाने दोन घास मिळावेत यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो. मात्र, काही व्यक्तींच्या बाबतीत हे सुखही पोरके असते. पोटात आगीचा डोंब उसळलेला असताना या वयातही चूल पेटवण्यासाठी धडपड करावी लागते. 

गरीब, दरिद्री कुटुंबातील व्यक्तींसाठी शासनाच्या विविध योजना असल्यातरी शेवटच्या गरजवंत कुटुंबापर्यंत त्याचा लाभ मिळत नाही. ढवार गल्ली शेव येथील लक्ष्मीबाई शाहूराव वडागळे या महिला आपल्या पतीसह ६०० रुपये भाड्याच्या खोलीमध्ये त्या राहतात. त्यांना आपत्य नसल्यामुळे तसेच पती वयोवृध्द असल्यामुळे या वयातही धुणी, भांडी करुन घर चालवतात. ज्या वयात स्वत:च शरीर साथ देत नाही. डोळयांची नजर क्षीण होते. अशा असहाय्य अवस्थेत दोन घास खायला मिळावेत यासाठी घराची चूल पेटावी म्हणून जळाणासाठी सरपण गोळा करुन अशा स्थितीत नेण्यासाठी कसरत करावी लागते. त्याचे बोलके उदाहरण शेवगांव येथील पाथर्डी रस्त्यावरील गाडगेबाबा चौकात वडागळे या सरपणाचा भार उचलत नसल्याने दोरी बांधून ते ओढताना पहायला मिळाले.

कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनात हे चित्र पाहिल्यानंतर करुणा उत्पन्न होईल. मात्र ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची केले. अशा नातलगांकडून हेळसांड झाल्यानंतर वृध्दापकाळ म्हणजे कठीण समय येता कोण कामास येते याची प्रचिती देणारा ठरतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांमधून राहण्यासाठी हक्काचा निवारा, उज्ज्वला योजनेतून गॅस कनेक्शन, वृध्दापकाळ निराधार पेन्शन अशा सुविधा मिळत असल्यातरी नेमके खरे वंचित त्यापासून दूर असतात.

शासनाच्या विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यासाठी वेगेवगळ्या कार्यालयांचे हेलपाटे व दलालांचे चक्रव्यूह भेदण्याची ताकद या वयात नसल्यामुळेच अशा पध्दतीने असहाय्य कष्टप्रद जगणे या माऊलीच्या वाट्याला आले आहे. 

Web Title: The Old Age Women Suffering Various Problems