जुना आंबागड तलावाच्या पाळीला पडल्या भेगा; आदिवासीबहुल 48 कुटुंबाच्या लोकवस्तीला धोका

तुमसर : तलावाच्या पाळीला पडलेले मोठे भगदाड.
तुमसर : तलावाच्या पाळीला पडलेले मोठे भगदाड.

तुमसर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील रामपूर येथील जुना आंबागड तलाव जीर्ण झाला आहे. तलावाच्या पाळीला मोठे भगदाड पडले असून तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या प्रकरणी गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, याकडे विभागाचे दुर्लक्ष कायम आहे.

तुमसर तालुक्‍यातील जुना आंबागड येथील गावशिवाराजवळच मोठा प्राचीन तलाव आहे. या तलावाच्या पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचनासाठी करतात. यापूर्वी तलावात फारसे पाणी येत नव्हते. मात्र, बावनथडी प्रकल्पामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत आहे. त्यामुळे सदैव पाण्याने काठोकाठ भरलेल्या या तलावाला धोका निर्माण झाला आहे.

पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार

तलावाची पाळही जीर्ण झाल्याने याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. ठिकठिकाणी या भेगांमधून पाणी वाहत असल्याने पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून तक्रार केली. मात्र, हा तलाव आमच्या अखत्यारित येत नसल्याची उडवाउडवीची उत्तरे देत कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली आहे.

तलावातील पाण्याची पातळी वाढल्याने धोका

यानंतर गावकऱ्यांनी स्वखर्चाने पाळीवर मुरूम घालून बुजविण्याचा प्रयत्न केला. पण, गावातीलच एका तक्रारीनंतर हे काम अर्धवट राहिले. आजही या तलावातून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सुरू असल्याने तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. तलावातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे. त्यामुळे तलावाच्या खालच्या भागात असलेल्या आदिवासीबहुल 48 कुटुंबाच्या लोकवस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे.

येथे अनेक शेतकरी धानपिकाची लागवड करतात. त्यामुळे तलावाची पाळ फुटल्यास मानवी जीवितहानीसह शेतीचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष देऊन तलावाच्या दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र इळपाचे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com