जुनी पुस्तकं हाच आमच्या ‘पोटा’चा सातबारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

तिसऱ्या पिढीसमोर जगण्याचा प्रश्‍न - जुन्या पुस्तकांच्या बाजारावर येणार संक्रांत   

नागपूर - ‘सत्तर वर्षे झाली साहेब, आमचे मायबाप येथं पुस्तक विकत होते. आता आम्ही विकतो. या व्यवसायावर आमची तिसरी पिढी जगत आहे. जुन्या पुस्तकांचा बाजार म्हणजे आमच्या पोटाचा सातबारा. दीडशे कुटुंबांचा गाडा या पुस्तकाच्या खरेदी-विक्रीतून चालतो. बाजार बंद झाला तर आमच्या लेकराबारांची पोटं भराची कशी?’’ राहून राहून हाच संतप्त सवाल जुन्या पुस्तकांची खरेदी-विक्री करणारे दुकानदार करीत आहेत.   

झिरो माइल परिसरात रस्त्यावर तसेच उपसंचालक कार्यालयासमोरील जागेत थाटलेल्या या बाजाराच वय सत्तर वर्षे. हा बाजार शेकडो जणांच्या कुटुंबांचा आधार आहे. परंतु वारंवार ही दुकाने हटविण्यासंदर्भात प्रशासन निर्णय घेते. आता मेट्रो प्रकल्पामुळे दुकानदारांना जागा सोडण्याचे मौखिक आदेश दिले आहेत. मेट्रोला सहकार्य आहे; परंतु आमच्या पोटाची भाकर असल्याने बाजारासाठी दुसरी जागा द्यावी, हीच दुकानदारांची मागणी आहे. 

अनेक मोठ्या पुस्तकांच्या दुकानांत जी पुस्तके मिळत नाहीत ती येथे हमखास मिळतात. काही दिवसांपूर्वी पार्किंगचा पेच निर्माण झाला होता. तो अडथळा दूर झाला. उड्डाणपुलामुळे या दुकानांवर संकट आले होते. परंतु सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ग्वाहीनंतर दुकाने वाचली. मेट्रोमुळे या दुकानांवर पुन्हा संक्रांत आली. यामुळे गडकरी यांनीच दुकाने वाचवावीत, अशी मागणी नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष नरेश वहाणे यांनी केली. 

मुलांच्या मासिकांमध्ये चांदोबासह करिअर गायडन्स, फॅशन डिझाइन, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील जुनी मासिके, एमपीएससी, यूपीएससी, नेट, सेट, पीएमटी, एआयईईई, एसईईई, एनडीए, आयआयटी, बॅंकेच्या परीक्षांची पुस्तके, स्टाफ सिलेक्‍शन कमिशन, साहित्य, मेडिकल, अभियांत्रिकीच्या पुस्तकांसाठी विदर्भ, मुंबईसह छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील पुस्तकप्रेमी दुर्मिळ पुस्तकांसाठी येथे येतात. त्यामुळे बाजारासाठी जागा मिळणे गरजेचे आहे.
- नरेश वहाणे, अध्यक्ष, नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था. 

दिल्लीतील चांदणी चौकात जुन्या पुस्तकांचा बाजार दिल्लीची ओळख आहे. तीच ओळख नागपूरच्या जुन्या पुस्तकांच्या बाजाराची आहे. यामुळे झिरो माइल स्टोनसारखे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाजारातून वाचनसंस्कृती जोपासली जात आहे. तिच्यावर आघात करू नका. 
- नरेश शेलार, सचिव, नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था.

Web Title: old books is my life