video : ऐका होऽऽ ऐका... शंभर रुपयांत पाच जीन्स 

केवल जीवनतारे 
रविवार, 8 डिसेंबर 2019

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम प्रवेशद्वाराजवळ दर शनिवारी चिंधी बाजार भरतो. गोऱ्या लोकांचं राज्य होतं, अर्थात या चिंधीबाजाराचं वय स्वातंत्र्यापूर्वींचं. तेव्हापासून चिंध्यांच्या विक्रीचा बाजार येथे फुलतो. येथे जुने कपडे विकणारा प्रत्येकजण शनिवारच्या प्रतीक्षेत असतो.

नागपूर : "दररोज सूर्य उगवतो अन्‌ मावळतो, उगवणाऱ्या अन्‌ मावळत्या सूर्याले हात जोडतो, देवीले नवस करतो, फाटक्‍या चपला टाकून दारोदारी फिरताना माथ्यावर आलेला सूर्य नुसताच आग ओकतो. या आगीनं जीवाची लाई लाई होते. डोक्‍यावरच्या हाऱ्यातील नवे कोरे करकरीत भांडे देतो, तवा जुने कपडे भेटतत, तवा शनिवारी डोक्‍यावर चिंध्याचा भारा घेऊन चिंधी बाजारात येतो अन्‌ येथी कधी बोहनी बी होत नाही, तवा मात्र पोटातली आग पेटते..' ही भावना आहे, पंच्याहत्तरी गाठलेल्या सत्यफुला सनेश्‍वर यांच्यांसारख्या शेकडो विक्रेत्यांची. 

सत्यफुलाबाईचा चेहरा सुरकुत्यांनी माखलेला. मात्र, आवाजात अजूनही कणखरता. जवळ जाताच पॅन्ट, शर्ट काय देऊ? थंडी आहे, कोट देऊ का? अशी विचारणा करतात. काहीही घेणार नाही, असे समजताच त्या कासाविस होतात. आता या चिंधी बाजारातून पोट भरण्याइतकही मिळत नाही, परंतु शनिवार आला की, पावलं याच दिशेने वळत असल्याच्या भावनेतून चिंधी बाजार हेच त्यांच्या जगण्या मरण्याचे ठिकाण असल्याचे मनाला वाटून जाते. 

पोटाची खळगी भरण्याच्या गरजेतून उभा झालेला चिंधीबाजार. सत्यफुलाबाईसारख्या चिंधीबाजारात बसलेल्यांचं उजाड आयुष्य जगण्याचं मनोगत ऐकलं की मन विषण्ण होतं. नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम प्रवेशद्वाराजवळ दर शनिवारी हा चिंधीबाजार भरतो. गोऱ्या लोकांचं राज्य होतं, अर्थात या चिंधीबाजाराचं वय स्वातंत्र्यापूर्वींचं. तेव्हापासून चिंध्यांच्या विक्रीचा बाजार येथे फुलतो. पुढे येथे जुने कपडे विकण्याचा व्यवसाय सुरू झाला. येथे जुने कपडे विकणारा प्रत्येकजण शनिवारच्या प्रतीक्षेत असतो. 

हेही वाचा - जहाल महिला नक्षलवादी पार्वती पोलिसांच्या ताब्यात

शनिवारी दुपारनंतर ग्राहक येऊ लागला की, पोटातल्या आतड्यायले ताण पडेपर्यंत ओरडून ग्राहकांना बोलवावं लागतं. या चिंध्या झालेल्या कपड्यातून पोटाची खळगी भरत असल्याचे सत्यफुलाबाई सांगतात. वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या या वृद्धेचं जगणही यापेक्षा वेगळं नाहीच. धड उभं राहता येत नाही. परंतु, डोक्‍यावर चिंध्याचा भारा घेऊन येतात. त्या सांगतात, "बापू, जिंदगी गेली चिंध्या विकता विकता. दहा ते बारा वर्षांचं वय होतं, तवापासून येथी येतो. साठपासस्ट वर्ष झाले. जुने कपडे विकल्यावरच घरातली चूल पेटते.' सत्यफुलाबाईंनी सांगितल्याप्रमाणे, लीलाबाईपासून तर चंद्रभागाबाई, रफिक भाई, सदाशीव, गंगूबाई, राधिकाबाई, सलिम यांच्या साऱ्यांच्या आयुष्याच्या कथा या चिंधीबाजारात लपलेल्या आहेत. 

Image may contain: 1 person, sitting, standing and outdoor
जुने कपडे घेण्यासाठी आलेला ग्राहक 

 

रिक्षाचालक हाच खरा ग्राहक

चिंधीबाजारात श्रीमंतांनी फेकलेल्या कपड्यांना महत्त्व येते. गरिबांच्या गर्दीने हा बाजार फुलून जातो. पाच, दहा आणि पंधरा रुपयांत घालण्यास योग्य कपडे मिळतात. यामुळेच रिक्षाचालकापासून तर झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांच्या नजराही या बाजारावर असतात. रंगीबेरंगी कपडे विक्रीवर जस्त भर असतो. चांगले कपडे आले की, शंभर रुपयात पाच जीन्स विकत घेणारे ग्राहक येथे दिसतात. अशी एक नव्हे तर शेकडो महिला पुरुष येथे जुन्या कपड्यांचे दुकान थाटून बसले आहेत. 

काय - रामटेकच्या खदानीत बुडून वाघांचा मृत्यू

 

गरिबांचा सदाबहार वस्त्रभंडार

शनिवारचा बाजार संपला की, येथील बाया काचेची भरणी, जर्मनचे गंज, स्टीलच्या भांड्यांचा हारा घेऊन शहर पालथे घालतात. जुन्या साड्या, शर्ट, फुलपॅन्टच्या मोबदल्यात नवीन भांडे देतात. पैसे घेत नाही. जुन्या कपड्यांत भांडे मिळतील, हे त्यांच्या व्यवसायाचे वैशिट्य. यामुळे भांडी देत अधिकाधिक जुने कपडे मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा असतो. टाकाऊ, फाटक्‍या कपड्यांना धुऊन, इस्त्री करून, सुईदोऱ्याने शिवून विकण्याजोगे करतात. मग चिंधी बाजारात सजविले जातात. चिंधी बाजारातील खरीददार आणि विक्रेते दोघेही कफल्लक. पन्नासावर दुकाने थाटली जातात. यांच्या जगण्याचं ऑडिट केलं तर चिंध्या चिंध्या झालेलं भुके कंगाल आयुष्यच शिल्लक उरतं. चिंधीबाजार हा गरिबांचा सदाबहार वस्त्रभंडारच आहे. 

Image may contain: one or more people, people standing and people walking

 

मेट्रोने घातला पोटावर घाव

अनेक ठिकाणी हॉकर्स झोन तयार झाले. तेथे त्यांना दुकान थाटण्यासाठी फुटपाथ तयार केले. मात्र, चिंधीबाजारात जुने कपडे घेऊन बसणाऱ्यांसाठी फुटपाथ नाही. शेडही नाही. ना सरकार, ना समाज, सोबत असते ती आभाळाची साथ. येथून मेट्रो गेली, या मेट्रोने आम्हा गरिबांच्या पोटावरच घाव घातले. फॉर्म भरून नेले, परंतु महापालिकेने ना दुसरी जागा दिली, ना शेड बनवून दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old clothing market fills in Nagpur