जुन्या खेळांच्या केवळ आठवणीच शिल्लक; मुले टिव्ही, मोबाईलमध्ये व्यस्त 

शुभम शहारे   | Thursday, 28 May 2020

ग्रामीण भागात लहानाचे मोठे होऊन नोकरीनिमित्त शहरात गेलेले व्यक्ती जेव्हा आपल्या मूळ गावी सणावारानिमित्त किंवा काही कारणास्तव येतो, तेव्हा त्यांना मातीभरल्या रस्त्यांवर रखरखत्या उन्हात किंवा झाडाच्या सावलीत खेळणाऱ्या लहान मुलांना पाहून त्यांच्या बालपणातील आठवणी ताज्या करतात.

चिखली (जि. गोंदिया) : शहर असो वा गावखेडे पूर्वीच्या काळी मुले घराच्या अंगणात अथवा मैदानात विटीदांडू, डाबाडुबी, झोपाळ्यावर झुलणे, लंगडी, भोवरा इत्यादी खेळ खेळताना दिसत होती. मात्र, जसजसा काळ बदलला आणि टीव्ही, मोबाईल सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला, तसा मुलांच्या आवडीनिवडी आणि खेळांमध्ये सुद्धा बदल झाला. आता शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलेसुद्धा टीव्हीवरील कार्टून आणि मोबाईलमध्ये गुंतलेले आढळून येत आहेत. 

ग्रामीण भागात लहानाचे मोठे होऊन नोकरीनिमित्त शहरात गेलेले व्यक्ती जेव्हा आपल्या मूळ गावी सणावारानिमित्त किंवा काही कारणास्तव येतो, तेव्हा त्यांना मातीभरल्या रस्त्यांवर रखरखत्या उन्हात किंवा झाडाच्या सावलीत खेळणाऱ्या लहान मुलांना पाहून त्यांच्या बालपणातील आठवणी ताज्या करतात. पूर्वी उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यावर शाळांच्या परीक्षा आटोपताच शहरात राहणारी मुले गावात राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबा, मामा, मावशीकडे जात असत.  तेव्हा गावी गेल्यानंतर ते भरपूर खेळायचे. आता ते चित्र क्वचितच दिसते. लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमाकरिता ही मंडळी फक्त गावात येऊ लागली आहे. 

अवश्य वाचा- आश्चर्य! पळसाच्या झाडातून निघतेय सॅनिटायझर!

पूर्वी लहानपणी मामाच्या गावाला सुट्ट्या घालवण्याकरिता येणारी मुले गावखेड्यातील खेळांमध्ये रममाण व्हायचे. गावातील मुलांसोबत तेसुद्धा विटीदांडू, डाबाडुबी, भोवरा, लपाछपी, मामाचे पत्र हरवले सारखे खेळ खेळायचे. तर मुली लगोऱ्या व लंगडी या खेळांमध्ये रमायच्या. मेहंदीच्या झाडाची पाने तोडून त्यापासून निघालेल्या रसाने हातावर मेहंदी रेखाटतानाचे चित्र दिसत होते. आता मात्र असे चित्र गावखेड्यात कुठेही दिसत नाही. आताची मुले मातिकल्प या खेळापासून अतिप्त झाले असून त्यांना टीव्हीसमोर बसून कार्टून पाहणे, व्हिडिओ गेम खेळणे अधिक पसंत करतात.